मला गुंड बोलण्याचा अधिकार कोणी दिला? राजा ठाकूर राऊतांवर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

raja thakur and sanjay raut

मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी राजा ठाकूर यांना माझी सुपारी दिली आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. याप्रकरणी आता खुद्द राजा ठाकूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझ्या इज्जतीची वाट लावतायत, मला गुंड बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल उपस्थित करताच संजय राऊतांविरोधात मी तक्रार करणार आहे, असं राजा ठाकूर म्हणाले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा  – श्रीकांत शिंदेंनी राजा ठाकूरला माझी सुपारी दिली, संजय राऊतांचा आरोप

“राजा ठाकूर हा ठाण्यातील कुख्यात गुंड असून त्याला जामिनावर सोडवण्यात आलं आहे. जामिनावर सोडवून त्यांना टास्क देण्यात आले आहेत,” असे आरोप संजय राऊतांनी केले आहेत. यावरून राजा ठाकूर यांनी संताप व्यक्त केला असून सत्ता गेल्यापासून राऊत प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही बरळतात असा पलटवार राजा ठाकूर यांनी केला आहे. तसंच, माझी बदनामी केल्याप्रकरणी मी पोलिसांत जाणार असल्याचंही ते म्हणाले.

“माझी बायको वकील आहे. त्यामुळे आम्ही संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहोत. माझ्यावर त्यांनी खोटा आळ आणला आहे. मला कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे,” असं राजा ठाकूर म्हणाले. तसंच, “संजय राऊत कोणाबद्दल काहीही बोलू शकतात. तुमच्या राजकारणात लोकल लोकांना का इनवॉल्व करता,” असा सवालही राजा ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा गुंडांना जामिनावर सोडवून त्यांना टास्क दिला जातोय, संजय राऊतांचा पुन्हा मोठा आरोप

संजय राऊतांनी काय आरोप केले?

संजय राऊतांनी आज मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित श्रीकांत शिंदेंवर मोठा आरोप केला आहे. श्रीकांत शिंदेंनी राजा ठाकूरला मला मारायची सुपारी दिली आहे, असं संजय राऊतांनी पत्रात म्हटलं आहे. संजय राऊत पत्रामध्ये म्हणतात की, “महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटविण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्यालाल कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे.”