घरमहाराष्ट्रहनुमानभक्त राणा यांचा राम कोण? 'सामना'तून भाजपावर शरसंधान

हनुमानभक्त राणा यांचा राम कोण? ‘सामना’तून भाजपावर शरसंधान

Subscribe

मुंबई : रवी राणा हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमानभक्त आहेत. संकट आले व सत्य बोलायचे असेल तर ते हनुमान चालिसा वाचतात व बेभानपणे आरोपांची गदा फिरवितात. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल? राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल, असे शरसंधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपावर केले आहे.

सरकारला पाठिंबा देणारे दोन आमदार कडू आणि राणा यांच्यातील वाद संपला असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करावे लागले. त्यापाठोपाठ आमदार बच्चू कडू यांनीही ‘पहिली चूक’ म्हणून आमदार रवी राणा यांना माफी जाहीर केली. प्रहार पक्षाच्या अमरावतीमधील मेळाव्यात बोलताना कडू यांनी राणा यांच्या आरोपाचे कडू घोट महप्रयासाने पचवले. कडू म्हणाले, ‘सत्ता गेली चुलीत! कोणीही येऊन काहीही बोलावं हे चालणार नाही. पहिली वेळ आहे म्हणून माफ करू, पण यापुढे अशी चूक केली तर ‘प्रहार’चा वार दाखवून देऊ.’ कडू यांचा हा इशारा जसा राणा यांना आहे तसाच तो सरकारलाही आहे. याचे धोके ठाऊक असल्यानेच महाराष्ट्रात असंख्य प्रश्नांचा डोंगर असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना या दोन आमदारांचा ‘राडा’ संपविण्यात काही दिवस खर्चावे लागले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

‘खोक्या’वरून दोन आमदारांचे भांडण
अमरावतीमधील दोन आमदार बच्चू कडू व रवी राणा यांच्यात एखादा तात्त्विक वाद राज्याच्या किंवा लोकांच्या विकासासाठी घडला असता तर समजण्यासारखे होते. विदर्भातील मोठे उद्योग गुजरातमध्ये पळवून नेले व वैदर्भी जनतेचा लाखोंचा रोजगार बुडाला म्हणून या दोघांत भांडण पेटले असते तरीही ते समजून घेता आले असते. विकासासाठी निधी कमी पडत आहे, ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत यावर दोन आमदारांनी शब्दांची ढाल-तलवार चालवली असती तरी जनतेने त्यांचे स्वागत केले असते व त्यांच्या तोंडून निघालेली चिखलफेक सहन केली असती, पण दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरून सुरू झाले व महाराष्ट्राने तमाशा पाहिला. बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते व गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतले असा हल्ला आमदार राणा यांनी कडू यांच्या मतदारसंघात जाऊन केला. बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार असल्याचा दुसरा हल्ला राणा यांनी करताच कडू यांनीही हिसका दाखवला व राणांची बरीच पोलखोल केली, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

वाद मिटलेला नाही
राणा व कडू यांच्यातील वाद खोक्यांवरून निर्माण झाला, ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आता उपमुख्यमंत्री महोदयांच्या भेटीनंतर राणा यांनी खोक्यांसंदर्भातले त्यांचे शब्द मागे घेतले आहेत. त्यांनी दिलगिरी वगैरे व्यक्त केली, पण राणा यांनी हे शब्द मनापासून मागे घेतले काय ही शंकाच आहे. कारण रवी राणा यांनी बुधवारी पुन्हा ‘आम्हाला कोणी धमक्या देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमत आहे’, अशी थेट धमकीच कडू यांना दिली. त्यावर कडू यांनीही ‘मी 5 तारखेला घरी आहे. त्यांनी मारायला यावं,’ असा प्रतिइशारा दिला आहे. म्हणजे राणा-कडू यांच्यातील वाद मिटलेला नाही, असाच याचा अर्थ, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अधोरेखित केले आहे.

- Advertisement -

काळाने सूड घ्यायला सुरुवात केली
आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नाते जुळवायचे म्हटले तरी लोक मागे हटतील. काळाने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते. त्याला कोण काय करणार? असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -