मुंबई : राज्यामध्ये तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकार एकापाठोपाठ एक उघडकीस येत आहेत. आता तर, औरंगाबादमधील आणखी एक प्रकार उघडकीस आला असून या परीक्षार्थीला आत उत्तरे पुरवण्याच्या तयारीत असलेल्या एकाला अटक करण्यात आली आहे. यासाठी 10 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. त्यावरून, याचा कर्ताकरविता कोण आहे? असा संतप्त सवाल काँग्रेसने केला आहे.
नोकर भरतीतही खोके पॅटर्न! बेरोजगारीने होरपळलेली तरुण पिढी जीव तोडून नोकर भरतीची तयारी करत आहे. पण, लाखो रुपये घेऊन त्यांच्या स्वप्नांना विकण्याचे काम हे खोके सरकार करत आहे. वनरक्षक भरतीतील गैरव्यवहारानंतर आता तलाठी पद १० लाखात विकले जातेय.
पण, महाराष्ट्राच्या युवकांचे भविष्य… pic.twitter.com/qvi0SVl9o9
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 7, 2023
तलाठी भरतीची घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यभरातून 4466 जागांसाठी सुमारे साडेअकरा लाख अर्ज सरकार दरबारी दाखल झाले. छाननी झाल्यानंतर 10 लाख 40 हजार 713 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येत असून त्यापैकी 17 ते 22 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर हे दोन टप्पे पार पडले आहेत. आता 4 सप्टेंबरपासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. यादरम्यान विविध ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे.
हेही वाचा – आरक्षणासंदर्भात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले…
औरंगाबादच्या चिखलठाण्यात मंगळवारी परीक्षा केंद्राबाहेरून उमेदवाराला उत्तरे पुरवण्याच्या तयारीत असलेल्या राजू भीमराव नागरे याला पोलिसांनी अटक करून झडती घेतली असता मास्टर कार्ड आणि दोन मोबाईल सापडले. त्यातील टेलिग्रामवर प्रश्नपत्रिकेतील 34 प्रश्नांचे छायाचित्र असल्याचे आढळले. परीक्षा 9 वाजता सुरू झाल्यावर अवघ्या 16व्या मिनिटाला त्याला प्रश्न मिळाले होते आणि तब्बल दहा लाख रुपयांचा हा व्यवहार होता, असेही सांगण्यात येते.
यावरून काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया देताना, नोकर भरतीतही खोके पॅटर्न असल्याची टीका केली आहे. बेरोजगारीने होरपळलेली तरुण पिढी जीव तोडून नोकर भरतीची तयारी करत आहे. पण, लाखो रुपये घेऊन त्यांच्या स्वप्नांना विकण्याचे काम हे खोके सरकार करत आहे. वनरक्षक भरतीतील गैरव्यवहारानंतर आता तलाठीपद 10 लाखांत विकले जात असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
हेही वाचा – शिवसेनेची ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हीच भूमिका आहे आणि राहणार, ठाकरे गटाने ठणकावले
महाराष्ट्राच्या युवकांचे भविष्य आम्ही असे विकू देणार नाही. याचा कर्ताकरविता कोण आहे? पदभरतीमधील गैरप्रकारांचे उत्तर सरकारने द्यायलाच हवे. दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. ईमान विकणाऱ्या या सरकारने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? असा उद्विग्न सवालही काँग्रेसने केला आहे.