घरमहाराष्ट्रनाशिककुंकू लावायचे की नाही हे ठरवणारे संभाजी भिडे कोण?; वाचा तरुणींच्या संतप्त...

कुंकू लावायचे की नाही हे ठरवणारे संभाजी भिडे कोण?; वाचा तरुणींच्या संतप्त प्रतिक्रिया

Subscribe

मानसी देशमुख । नाशिक

नाशिक :  महिला पत्रकाराने कपाळी कुंकू लावले नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देणारे संभाजी भिडे यांच्यावर सर्वत्र टिका होत असताना महिला संघटनेच्या पदाधिकारीही आक्रमक झाल्या आहेत. कुठल्या महिलेने कुंकू लावावा आणि कुणी लावू नये, हे ठरवण्याचा अधिकार भिडेंना कुणी दिला, असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी भिडेंनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. महिलांच्या या ज्वलंत प्रश्नावर विविध क्षेत्रातील महिलांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया…

संभाजी भिडेंचे आतापर्यंतचे सर्व वक्तव्य सनातनी वृत्तीचे आहेत. आपण त्यांना गुरुजी म्हणतो, आदर देतो पण नावाला शोभेल असे त्यांनी काही केलेले नाही. आतापर्यंत सर्व वक्तव्य त्यांनी महिलांविरोधी केलेले आहेत. महिलांऐवजी पुरुष पत्रकार असता तर काय केले असते? असे वक्तव्य करतात याचा अर्थ ते संविधान मानत नाहीत. संभाजी भिडे यांनी महिला वर्गाची माफी मागावी. : माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र

आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहे. महिलेच्या कुंकू किंवा टिकलीवर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कुंकू किंवा टिकलीने महिलेचे ज्ञान दिसत नाही, महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचे ठरते. : विशाखा ठाकरे, विभाग प्रमुख, मास मीडिया, केटीएचएम

महिलांबाबत अशा प्रकारचे भाष्य करणे चुकीचे आहे. कुंकू लावायचा की नाही हा पूर्णतः महिलेचा वैयक्तिक प्रश्न आहे. तिने कसे राहावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य महिलेला आहे. अशा वक्त्यांमुळे समाज किती मागास आहे, हे दिसते. विदेशात अशा प्रश्नांवर चर्चाही होत नसेल. : भक्ती निकम, विद्यार्थिनी

महिलेने कसे राहावे, कसे वागावे हे तिला कोणीही सांगू शकत नाही. हा महिलेचा स्वतंत्र प्रश्न आहे. महिलेचे कुंकू तिचे ज्ञान ठरवत नाही. याउलट अशा वक्तव्यांमुळे संभाजी भिडे यांचे अज्ञान समाजाला दिसून येते. महिलांविरोधी अशा वक्तव्यांचे समर्थन कदापी होऊ शकत नाही. : पूनम पाटील, अभिनेत्री

भिडे गुरुजी यांना अजूनही महिलांबद्दल एवढा राग का आहे. ते त्यांचे मनोवादी विचार का बदलत नाहीत. कोणी टिकली, कुंकू लावायचे, कोणी नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. भिडे गुरुजी यांनी त्यांचे विचार बदलले पाहिजे. भिडे गुरुजी यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागितली पाहिजे. तृप्ती देसाई,अध्यक्ष, भूमाता ब्रिगेड

आपण कोणत्या युगात काय बोलतोय, याचा तरी विचार व्हावा. आज वैद्यकीय, हवाई, लष्कर अशी अनेक क्षेत्रं आहेत, जिथे आभूषण दूर सारून तुमचे कौशल्य महत्त्वाचे ठरते. संस्कृती म्हणून टिकली असावी, मात्र त्यासाठी उगाचच अट्टहास करायला नको. : ललिता पाटोळे, कॉस्मॅटोलॉजिस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -