घरक्राइमसट्टाबाजारानुसार 'बीएमसी'च्या रणांगणात कोण फेव्हरेट ?

सट्टाबाजारानुसार ‘बीएमसी’च्या रणांगणात कोण फेव्हरेट ?

Subscribe

मागील काही निवडणुकांमध्ये सट्टाबाजाराचा कौल ठरला आहे वास्तविक

नाशिक : सट्टा खेळणे भारतात बेकायदेशीर असले तरी छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात सट्टाबाजार चालतो. हे वास्तव कोणीही नाकारणार नाही. सट्टाबाजार म्हणजे फक्त क्रिकेट किंवा इतर खेळांच्या मॅच असाच सामान्यांचा समज असतो. परंतु मागील वर्षात सट्टा अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर खेळला जात आहे. त्यातही निवडणुका हा सट्टाबाजाराचा लोकप्रिय घटक बनला आहे.

ओबीसी आरक्षण आणि इतर काही कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू केला आहे. आणि त्यामुळे काहीसे निद्रित झालेले राजकीय पक्ष आणि इच्छुक पुन्हा एकदा जागे झाले आहेत आणि आपली रणनीती नव्याने तयार करून कामाला लागले आहेत.

राज्यातील निवडणूक होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यांचे लक्ष लागून असलेली, देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे बृहन्मुंबई महानगर पालिका, ही महानगरपालिका ताब्यात असणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रस्थानी असणे असा त्याचा अर्थ होतो. मागील २५ वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली आणि शिवसेनेचा श्वास म्हंटल्या गेलेली ही महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी प्रमुख विरोधीपक्ष भाजपानेही चांगलीच कंबर कसली आहे.

ज्या पद्धतीने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत त्याच पद्धतीने सट्टाबाजारही कामाला लागला आहे. आणि अगदी अटीतटीची होऊ शकत असलेल्या या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोण जिंकणार, कोण पराभूत होणार यावर सट्टाबाजार तापला आहे. अगदी कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडणूक येणार, कुठल्या वार्ड मध्ये कोण निवडून येणार, किती लीडने निवडून येणार इथपर्यंत सट्टा लावायला सुरवात झाली आहे. सट्टा खेळणाऱ्यांची स्वतःची स्वतंत्र यंत्रणा प्रत्येक वार्ड निहाय सर्व्हे करून माहिती गोळा करते आणि त्यानुसार पक्ष, उमेदवार यांच्यावर लागणाऱ्या सट्टयाची किंमत ठरते आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात, राज्यात आणि मुंबईत सुरू असलेले अनेक वाद-विवाद, आंदोलन, निदर्शन, राज्य सरकारची कामगिरी, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील २५ वर्षाच्या सत्तेनंतरची अँटी-इंकम्बसी याच फ्लस्वरूप म्हणून शिवसेनेची काहीशी पीछेहाट होताना दिसत आहे. तर मागील निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देणारी आणि मागील पाच वर्षात संघटना बांधणी करून सतत वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम, आंदोलन आदी गोष्टींच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलेली भाजपा सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे.

सट्टाबाजाराचा कौल जरी भाजपाच्या बाजूने असला तरी वस्तुस्थिती वेगळी असू शकते. परंतु मागील काही निवडणुकांमध्ये सट्टाबाजाराचा कौल बहुतांश वेळा सत्यात उतरला आहे त्यामुळे याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांना अजून ४ महिन्यांचा अवधी आहे आणि तोपर्यंत जसजसं राजकारणाची समीकरणे बदलतील तसतस सट्टाबाजारातीलही गणितं बदलतील असेही यावेळी सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -