घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडी सरकारचा फायर ब्रॅण्ड डीजी कोण? चार आयपीएस अधिकार्‍यांमध्ये स्पर्धा

महाविकास आघाडी सरकारचा फायर ब्रॅण्ड डीजी कोण? चार आयपीएस अधिकार्‍यांमध्ये स्पर्धा

Subscribe

सध्या सुरू असलेला केंद्र विरूद्ध राज्य असा संघर्ष पाहता राज्यात पोलीस महासंचालक (डीजी) पदी कोणाला संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पण महाविकास आघाडीला जो आयपीएस अधिकारी हा आपला माणूस वाटतो त्याच व्यक्तीला या पदासाठीची पसंती मिळू शकते. पोलीस महासंचालकपदी एकूण चार अधिकार्‍यांची नावे चर्चेत आहेत. पण सेवा ज्येष्ठतेनुसारच नव्या पोलीस महासंचालकपदी वर्णी लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर हे पद काही महिन्यांसाठी रिक्तही राहू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तीन पक्षांचे सरकार असल्यानेच तिन्ही पक्षातील नेत्यांना पसंतीच्या अधिकार्‍याची वर्णी या पदावर लागू शकते हे स्पष्ट आहे. याआधीच डीसीपी बदल्यांमध्ये झालेल्या घोळामुळे यंदा ही रिस्क सरकारकडून घेतली जाणार नाही. बदलीच्या वेळी मेरिटनुसार बदली होणार की सरकारसाठी अनुकूल अशा अधिकार्‍याची निवड होणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. 1985 च्या बॅचचे विद्यमान पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे सप्टेंबर 2022 रोजी निवृत्त होणार होते, पण त्याआधीच त्यांनी ऑक्टोबर अखेरीस अर्ज केला होता. दोन महिन्यांनी त्यावर केंद्राने निर्णय घेत जयस्वाल यांची प्रतिनियुक्ती सीआयएसएफमध्ये महासंचालक पदावर केली. त्यामुळेच आता या पदासाठीची जागा रिक्त झाली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार सर्वात आधी क्रमांक लागतो तो होमगार्डचे महासंचालक १९८६च्या बॅचचे संजय पांडे यांचा. जयस्वाल यांच्या नंतर पोलीस दलात सर्वात ज्येष्ठ अधिकारी पांडे हेच आहेत.

- Advertisement -

संजय पांडे हे 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. मधल्या काळात खासगी कंपनीत मोठ्या हुद्यावर ते गेले होते. पण मुंबई पोलीस दलात परतल्यावर त्यांना साईड पोस्टिंगवर म्हणजे होमगार्डचे महासंचालक म्हणूनच सध्या काम करावे लागले. या पदालाही त्यांनी न्याय देत दुर्लक्षित अशा होमगार्डमधील भ्रष्टाचार उघडकीस आणला. तसेच या विभागातही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आमूलाग्र बदल घडवले. महाराष्ट्र स्टेट पोलीस हाऊसिंग अ‍ॅण्ड वेल्फेअर कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष असलेले बिपीन बिहारी हेदेखील या स्पर्धेत आहेत. तर तुरूंग विभागाचे महासंचालक एस एन पांडे हेदेखील स्पर्धेत आहेत. हे दोघेही 1987 बॅचचे अधिकारी आहेत. मात्र बीपीन बिहारी हे जानेवारी २०२१ आणि एसएन पांडे हे फेब्रुवारी २०२१ अखेरीस निवृत्त होत आहेत. साधारण सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी असल्यास त्या व्यक्तिचा महासंचालक पदासाठी विचार केला जात नाही.

हेमंत नगराळे हेदेखील 1987 बॅचचे अधिकारी असून, मुंबई पोलीस आयुक्त असलेले 1988 बॅचचे परमबीर सिंह आणि 1988 बॅचच्या रश्मी शुक्लाही या पदाच्या दावेदार मानल्या जात आहेत.

- Advertisement -

याआधीचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पसंतीच्या अधिकार्‍यांची वर्णी या बड्या पोस्टसाठी वेळोवेळी लावली आहे. उद्धव ठाकरे यांनाही यानिमित्ताने सुवर्णसंधी आहे की, आपल्या मर्जीतला अधिकारी निवडता येईल. एखादा फायर ब्रँड अधिकारी म्हणून यामध्ये सर्वात उजवे ठरताहेत ते म्हणजे संजय पांडे. पांडे हे जून 2022 ला निवृत्त होत आहेत.

पोलीस महासंचालक पद प्रतिष्ठेचे आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांना पोलीस महासंचालक आपला वाटत नाहीए, यामुळेच ही खांदेपालट केल्याचे कळते. सुबोध जयस्वाल यांची नेमणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्या काळातली आहे. त्यामुळेच त्यांना सरकारच्या अनेक निर्णयात विचारात घेतले जात नसल्याची कुरबुर याआधी ऐकायला मिळाली आहे. राज्य सरकारचा हस्तक्षेप आणि कारभारातील ढवळाढवळ यामुळेच प्रतिनियुक्तीने जयस्वाल हे सीआयएसएफमध्ये गेल्याची चर्चा आहे.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे आपल्या विश्वासातला, कंट्रोल ठेवता येण्यासारख्या अधिकार्‍याच्या शोधात आहेत. असा अधिकारी दबंग स्टाईलने काम करेल, राज्याची धुरा सांभाळेल अशा अधिकार्‍याच्या शोधात सध्या महाविकास आघाडी आहे. मेरिटनुसार, सेवा ज्येष्ठतेनुसार, कामाच्या पद्धतीनुसार मुख्यमंत्र्यांना आपला वाटेल असा अधिकारी अधिकारी म्हणून या पदावर फिट म्हणून बसू शकतो. पण या नेमणुकीचा निर्णय हा एकट्या मुख्यमंत्र्यांचा नसेल. राज्य सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस कोणाला पसंती देतात हेदेखील तितकेच महत्वाचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -