Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आता कोणाकडे, ताई की दादा?

राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आता कोणाकडे, ताई की दादा?

Subscribe

Sharad Pawar Retirement उन्मेष खंडाळे : मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद आणि राजकीय जीवनातून निवृत्तीची घोषणा केली आहे. पवारांच्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भुकंप आला तर महाराष्ट्राच्या राजकारणातही काहूर माजले आहे. पवारांनी निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. मात्र शरद पवारांच्या स्वभावानुसार ते त्यांचा निर्णय फिरवण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा आगामी अध्यक्ष कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार ही दोन नावे अध्यक्षपदाच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत. पवारांच्या कुटुंबातच अध्यक्षपद राहील, अशीच दाट शक्यता आहे.

शरद पवार हे महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाचे राजकीय व्यक्तीमत्व आहेत. आज त्यांनी ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन मी दूर होत असलो तरी मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होणार नाही. मी विविध क्षेत्रात काम करत राहाणार आहे. सार्वजनिक कार्यक्रम, बैठकांमध्ये भाग घेत राहाणार आहे. मी पुणे, मुंबई, दिल्ली किंवा बारामती कुठेही असलो तरी सर्वांसाठी उपलब्ध असेल. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी २४ तास मी काम करत राहील.

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांनी १९ एप्रिल रोजी म्हटले होते, की दोन भूकंप होणार आहे. त्यातील एक तर आज झाला आहे. आता दुसरा धक्का कोणता असणार याची महाराष्ट्राला आणि देशाला उत्सूकता लागून राहिली आहे. दरम्यान महाराष्ट्रात सध्या अजित पवार काही आमदारांसह भाजपसोबत जाणार का, याचीच जोरदार चर्चा होती. अजित पवारांनी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी केला होता. हे कसे काय घडले होते, याबद्दल अजूनही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपासून आमदारांसह महाराष्ट्रात संभ्रम आहे. मात्र अजित पवारांनी नुकतेच स्पष्ट केले आहे की, ते आजन्म राष्ट्रवादी काँग्रेसोबतच राहाणार आहेत. मात्र त्यांनी मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षाही जाहीर केली होती, हेही तेवढेच खरे आहे. हा पक्षाला आणि पक्षश्रेष्ठींना त्यांचा एक प्रकारे संदेश मानला जात होता.

आज शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्व आमदार, खासदार, विविध राज्यातील पक्षाचे पदाधिकारी, महाराष्ट्रातील कार्यकर्ते पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती करत होते. त्याचवेळी अजित पवारांनी हा निर्णय कधीना कधी घ्यायचाच होता, तो आज घेतला आहे. साहेबांच्या समोरच जर कोणी पक्षाध्यक्ष होत असेल आणि त्याला साहेबांचे मार्गदर्शन लाभत असेल तर तुम्हाला अडचण काय? साहेबांच्या मार्गदर्शनात नवीन अध्यक्षाची निवड होईल. नवीन अध्यक्षाला त्यांचे मार्गदर्शन लाभेल. काँग्रेसमध्येही सोनिया गांधी या बाजूला झाल्या आहेत, आणि नेहरु-गांधी घराण्याच्या बाहेरचे मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष आहेत. ते सोनिया गांधी आणि राहुल यांच्या सल्ल्यानेच काम करतात. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही यापुढे शरद पवारांच्या सल्ल्यानेच काम होईल. त्यांच्याच मार्गदर्शनाने पक्ष पुढे जाईल.

- Advertisement -

शरद पवारांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करण्यासोबतच पक्षामध्ये एक समिती नेमुन नवीन अध्यक्षाची निवड करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे. या समितीत एकही नाव हे पवार कुटुंबियांपैकी एखाद्या नावाला विरोध करणारे नाही.

शरद पवारांची पक्षावरील पकड सैल होत चालली, म्हणून त्यांनी हा निर्णय जाहीर केला का? असाही सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीही दोनवेळा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांना असे वाटत होते की, पक्षात आपले ऐकले जात नाही. मात्र जेव्हा त्यांनी पक्षप्रमुख पद सोडण्याची घोषणा केली त्यानंतर त्यांची पक्षावरील पकड ही अधिक मजबूत होत होती. शरद पवारांनी देखील हिच खेळी खेळली आहे का? पक्षात पवारांचा दबदबा कमी झाला आहे का? काही नेत्यांकडून त्यांच्याकडे, त्यांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष्य होत आहे का? असेल, तर मग हे नेते कोण, हे राजकारणाची समज असलेल्या कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही.

शरद पवार यांनी हा निर्णय अचानक आणि घाईघाईने घेतलेला नाही, हेही अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार यांच्या देहबोलीवरुन लक्षात येत होते. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या निर्णयाने सर्वजण अव्वाक झालेल असताना प्रतिभा पवार यांच्या चेहऱ्यावरमात्र कोणतेही आश्चर्याचे भाव नव्हते. सुप्रिया सुळेही कार्यकर्त्यांप्रमाणे गर्भगळीत झाल्या नाहीत, किंवा त्यांना धक्का बसल्याचे जाणवले नाही. पवार कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून या निर्णयाबद्दल चर्चा सुरु होती. १ मे रोजी २०२३लाच या निर्णयाची घोषणा करण्याची पवारांची इच्छा होती, याची माहिती स्वतः अजित पवारांनी दिली. त्यामुळे पवार कुटुंबाला या निर्णयाची आधीपासून माहिती होती, हे मात्र निश्चित. आता प्रश्न निर्माण होतो तो आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार?

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ म्हटले जाणारे अंकुश काकडे, जितेंद्र आव्हाड आणि शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी काही आमदारांशी फोनवर संपर्क केला होता. पक्षाची धुरा जर अजित पवारांकडे देण्यात आली तर आमदारांची मनःस्थिती काय असणार, हे तपासून पाहिले जात होते. पवारांच्या सांगण्यावरुनच पक्षाच्या आमदारांसोबत हा संपर्क करण्यात आला होता, अशीही माहिती आहे. अजित पवार यांच्या आजच्या बोलण्यानुसार नवा अध्यक्ष हा पवारांच्या मार्गदर्शनात तयार होईल. तो कुठे चुकला तर पवार त्याला दुरूस्त करतील, यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार हे नक्की आहे. तो अध्यक्ष आता दादा असणार की ताई, एवढेच आता ठरायचे आहे.

सुप्रिया सुळे या पवारांच्या राजकीय वारस आहेत. पवारांनीही अनेकदा स्पष्ट केले आहे की सुप्रिया यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे आणि त्या राज्याच्या राजकारणात येणार नाही. तीन टर्म त्या लोकसभेच्या खासदार आहेत. दिल्लीतील राजकारणात त्यांना अधिक रस आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. दुसरे कारण म्हणजे त्या पवारांच्या कायम सोबत असतात. कोणताही सल्ला घ्यायचा असले, महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर मुलगी म्हणून पवारांचा सल्ला घेण्यात त्यांना कोणतीही अडकाठी किंवा कोणताही कमीपणाही येणार नाही. पक्षातील अनेक नेत्यांनाही सुप्रिया यांच्या नावाला नकार देता येणार नाही.

याशिवाय दुसरी शक्यता आहेत ते म्हणजे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार. १९९१ पासून अजित पवार संसदीय राजकारणात आहेत. पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९९५ पासून २०१९ पर्यंत सलग ते बारामती विधानसभेतून विजयी होत आले आहेत. उपमुख्यमंत्री, कॅबिनेटमंत्री आणि आता विरोधी पक्षनेतेपद ते सांभाळत आहेत. प्रशासनावर पकड असलेला राजकारणी म्हणून अजित पवारांची ओळख आहे. पक्षातील आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला तर अजित पवारही राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -