शिंदेंच्या शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण? राष्ट्रीय कार्यकारिणीत निर्णय होण्याची शक्यता

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर आज तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. आज (ता. २१ फेब्रुवारी) संध्याकाळी ७ वाजता ताज प्रेसेंडेंट हॉटेलमध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण? याबाब्तब निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Who is the party chief of Shinde's Shiv Sena decision likely made in national executive

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि नाव शिंदे गटाला मिळाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली. शिंदे गटाने निर्णय आल्यानंतर जल्लोष केला. तर यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात सतत एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या या महत्वपूर्ण निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच ही कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. मुंबईमधील ताज प्रेसेंडेंट हॉटेलमध्येही महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीला शिवसेनेचे आमदार, खासदार तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी शिवसेनेच्या पुढील रणनीतीबाबत आणि महत्वाच्या गोष्टींबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख पद स्वतःकडे ठेवणार असल्याचे आता बोलले जात आहे.

उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नाव दिल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाने सोमवारी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याबाबतची याचिका आज ठाकरे गटाकडून दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर गेल्या दोन दिवसांत राजकारणामध्ये भविष्यात आणखी काही घडामोडी घडणार असल्याचे बोलले जात आहे. तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आजपासून पुढील तीन दिवस सुनावणी होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यामध्ये वातावरण तापलेले पाहायला मिळाले. ज्यामुळे शिवसेनेच्या शाखा असलेल्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा – “माझं नाव उदयसिंह उद्धव बाळासाहेब ठाकरे”, ठाकरे गटाच्या आमदाराने दिली नवी ओळख!

निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आनंद व्यक्त केला तर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत निवडणूक आयोगावर टीका केली. ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाने दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज घेऊन हा निर्णय दिल्याचा आरोप केला आहे.