घरमहाराष्ट्रनाशिकहात कोणी कोणाला दाखवला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

हात कोणी कोणाला दाखवला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिर्डी दौरा वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ईशानेश्वर मंदिरात गेले होते. तेथे अंकशास्त्राचे अभ्यासक कॅप्टन अशोक खरात यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर आपले भविष्य जाणून घेतले, अशी चर्चा राज्यभर सुरू आहे. यावरुन घटनात्मक पदावरील व्यक्तीने भविष्य जाणून घेण्यासारख्या घटनांवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

राजकारणी आणि त्यांचे अध्यात्मिक गुरू हे समीकरण महाराष्ट्राला नवे नाही. मात्र, आता राजकारणी आपल्या राजकीय भवितव्यासाठी अंकशास्त्राचा आधार घेत असतील तर काय म्हणावे, अशी टीका अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केली आहे. विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्यानेच ते अशा गोष्टींकडे वळले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही मुख्यमंत्री शिंदेंवर टिकेची झोड उठविण्यात आली आहे. राज्यभरातून लक्ष्य केले जात असल्याने मुख्यमंत्री शिंदेंनी, हात कोणी कोणाला दाखवला, असे सांगत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

आम्ही जे करतो ते उघडपणे करतो. लपून-छपून करत नाही. काही लोक लपून-छपून करतात. आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आम्हाला आत्मविश्वास होता. त्यामुळेच 50 आमदार आणि 13 खासदार माझ्यासोबत आले. हात दाखवण्याबाबत म्हणाल तर आम्ही तुम्हाला 30 जूनला चांगलाच हात दाखवला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

शिंदे स्वत: तिथे का जातील?
मी साईबाबांचा भक्त आहे. त्या भागात माझे एक मित्र आहेत कॅप्टन खरात. त्यांचे ईशानेश्वर मंदिर आहे. एकनाथ शिंदे यांनी तिथे गो-शाळेसाठी देणगी दिली होती. मुख्यमंत्र्यांनी गोशाळेचे काम सुरू होण्याआधी भेट द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. कॅप्टन खरात यांचे प्रोफेशन भविष्य सांगण्याचे आहे. मात्र, शिंदे यांना भविष्य जाणून घ्यायचे असेल तर, ते तिथे का जातील? त्यांनी खरात यांना मुंबईत बोलावून घेतले असते, असा खुलासा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

- Advertisement -

आत्मविश्वास डळमळीत झाला आहे
दैनंदिन काम सोडून देवदर्शन करणे आणि ज्योतिषाला हात दाखवणे, ही म्हणजे आत्मविश्वासाला धक्का बसल्याची लक्षणे आहेत. जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा लोक अशा गोष्टींकडे वळतात. यापूर्वीही ते गुवाहाटीला गेले होते. आता ते पुन्हा एकदा आसामला जाणार आहेत. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालाय का, अशी शंका मला वाटायला लागली आहे, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

भविष्य बघणे कितपत योग्य
आम्ही शिर्डी येथे गेलो. पंढरपूर येथे गेलो तर, देवदर्शन घेतो. आपली ती परंपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो. मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे. 21व्या शतकात जग कुठे चालले आहे. विज्ञान काय सांगत आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात, काय बोलावे? आम्ही हे ऐकून हतबल झालो, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

श्रद्धा असावी, मात्र अंधश्रद्धा नको
प्रत्येकाची श्रद्धा असते, श्रद्धेवर आमचा विश्वास आहे अंधश्रद्धेवर नाही. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेविरोधात मोठे काम केले. आयुष्य पणाला लावले. आता घटनात्मक पदावरील व्यक्तीने श्रद्धा ठेवावी, मात्र अंधश्रद्धेबद्दल जनतेचे मत वेगळे आहे, हे लक्षात घ्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सरकार तंत्र-मंत्रात अडकले
महाराष्ट्रात कुणी उद्योग पळवते आहे तर कुणी आमच्या गावांवर वक्रदृष्टी ठेवते आहे. कारण, महाराष्ट्रात मिंधे सरकार अस्तित्वात आहे. सरकारचे प्रमुख देव-धर्म, तंत्र-मंत्र ज्योतिषात अडकले आहेत. त्यामुळे राज्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

शेतकर्‍यांकडे जायला वेळ नाही
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ज्योतिष्याकडे, मांत्रिकाकडे जायला वेळ आहे. आता कामाख्या देवीलाही ते जाणार आहेत. मात्र, त्यांना राज्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

ते भविष्य निर्माते
मुख्यमंत्र्यांना भविष्य पाहण्याची गरज नाही. ते भविष्यकाराचे भविष्य सांगतील. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील; पण शिंदेंना भविष्य बघण्याची गरज नाही. त्यांचे भविष्य उज्वलच आहे, असे सांगत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली.

हात दाखवण्याचा विषय नाही
मुख्यमंत्र्यांनी शिर्डीला दर्शन घेतले. त्यानंतर सिन्नरच्या ईशान्येश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पूजा केली. हात वगैरे दाखवण्याचा प्रकार झाला नाही. त्या चर्चेत काहीही तथ्य नाही. विरोधकांकडून केवळ वावड्या उठवल्या जात आहेत, असा पलटवार खणीकर्ममंत्री दादा भुसे यांनी केला.

हात कोणी कोणाला दाखवला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -