घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशकात खासदार गोडसेंना कोण देणार शह ?

नाशकात खासदार गोडसेंना कोण देणार शह ?

Subscribe

नाशिक : शिवसेनेने सलग दोन वेळा संधी दिल्यानंतरही खासदार हेमंत गोडसे हे शिंदे गटात सामील झाल्याने त्यांना शह देण्यासाठी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार कोकाटे यांनी तुल्यबळ लढत दिल्यामुळे गोडसेंविरोधात मराठा कार्ड खेळण्याची रणनीती आतापासूनच आखली जात आहे. तर, दुसरीकडे भाजपकडून आमदार डॉ. राहुल आहेर, दिनकर पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे गोडसे यांना उमेदवारी मिळते की नाही इथपासून आता चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे गटाच्या बंडानंतर नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. खा. हेमंत गोडसे यांनी शिंदे गटाचा मार्ग पत्करल्यानंतर त्यांच्या जागेवर सक्षम उमेदवाराला पुढे आणण्याची तयारी महाविकास आघाडी करत आहे. त्यादृष्टीने सद्यस्थितीत सिन्नरचे आमदार कोकाटे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची नावे पुढे आहेत. यापैकी माणिकराव कोकाटे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला; मात्र या उमेदवारीचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झाला.

- Advertisement -

पराभवाच्या छायेत असताना त्यांनी विजय मिळवल्यामुळे त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी देवून गोडसेंना पराभूत करण्याची व्यूहरचना आखली जात आहे. दुसरीकडे शिवसेनाही उमेदवारीवरील दावा सहजासहजी सोडणार नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत इच्छुक असलेले विजय करंजकर हे शिवसेनेकडून प्रबळ दावेदार मानले जात आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतदारांची संख्या मोठी आहे. या तिनही पक्षांची ताकद एकत्र आल्यास शिंदे गटासह भाजपला धोबीपछाड देता येईल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. महत्वाचे म्हणजे भाजपचा स्वतंत्र उमेदवार उभा राहिला तरी गोडसे हे सहजासहजी माघार घेणार नाहीत. कदाचित तोपर्यंत काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाहेर पडून स्वतंत्ररित्या लढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

- Advertisement -

हेमंत गोडसे

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीमुळे माजी मंत्री छगन भुजबळांचा पाऊणेदोन लाख मताांनी पराभव झाला होता. २०१९ च्या निवडणुकीत समीर भुजबळ यांचा गोडसेंशी सामना झाला. यातही गोडसेंनी बाजी मारली. मितभाषी गोडसेंनी विकासकामे केली, परंतु पक्षवाढीसाठी फारसे योगदान दिले नसल्याने शिवसेनेचा खासदार असूनही ते पक्षापासून अलिप्तच राहिले. त्यामुळे सेनेत त्यांच्याविषयी नाराजी आहे. आता तर गोडसे शिंदे गटात गेल्याने सेनेतून त्यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे उद्या भाजप-शिंदेगटाने एकत्रित उमेदवार देण्याचा निर्णय झाल्यास खासदार गोडसे दावेदार मानले जात आहेत.

 

विजय करंजकर 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर हेदेखील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार मानले जातात. गेल्या निवडणुकीत करंजकरांनाच उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. मात्र, खासदार गोडसेंना उमेदवारी दिली गेली. मात्र, तरीही करंजकरांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहून गोडसेंच्या विजयात हातभार लावला. करंजकरांची नाराजी दूर करण्यासाठी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या कोटयात सेनेकडून संधी देण्यात आली. मात्र, राज्यपालांनी नियुक्तीच न केल्याने करंजकरांना संधी मिळाली नाही. मात्र, आता लोकसभा निवडणुकीसाठी करंजकर सेनेचे उमेदवार असू शकतात.

 

डॉ. राहुल आहेर 

भाजपकडून संभाव्य उमेदवार कोण याची चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देणारा खमक्या उमेदवार शोधताना मनी, मसल पॉवरसह सर्वमान्य उमेदवार शोधताना आजी-माजी आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. भाजपकडून सध्या तरी डॉ. राहूल आहेर यांच्या नावाची चर्चा आहे. डॉ. आहेर दुसर्‍यांदा आमदार झाले आहेत. त्यांच्या कुटुंबात भारतीय जनता पक्षाची प्रदीर्घ पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील डॉ. दौलतराव आहेर १९९५ ते १९९९ या कालावधीत राज्याचे आरोग्यमंत्री होते.

 

माणिकराव कोकाटे 

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे नेते आहेत. ते चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या चारही प्रमुख पक्षातून त्यांनी निवडणूक लढवली आहे. भाजप वगळता इतर सर्व पक्षातून ते निवडून आले. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला व सिन्नरमधून उमेदवारीही मिळाली. यापूर्वीही त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूकही लढवली होती. लोकसभा निवडणुकीत १ लाख ३४ हजार २९९ मते मिळाली होती. एकट्या सिन्नर मतदारसंघातून ९१ हजार ११४ मते होती. त्यापूर्वी भाजपकडून लोकसभेची तयारी करणारे कोकाटे उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढले होते. कोकाटेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिल्यास कोकाटे व गोडसे हे मराठा उमेदवार समोरासमोर येतील.

 

दिनकर पाटील 

भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनीही तयारी केली आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रारंभी त्यांनी प्रयत्न केले होते. परंतु, आ. सीमा हिरे यांनाच संधी दिली गेल्याने ते काही काळ नाराज होते. परंतु, लोकसभा निवडणुकीत उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींनी शब्द दिल्याने पाटील यांनी हिरे यांच्यासाठी ‘तन-मन-धना’ने मदत केली. पाटील यांनी लोकसभा मतदारसंघ डोळ्यांसमोर ठेऊन काम सुरू केले आहे. कोविड काळातील मदत, शिवजयंती व डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मंडळांना केलेली मदत व वैयक्तिक संपर्क दौरे बघता पाटील यांनी आतापासूनच प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -