अफझल खानाच्या कबरीशेजारी तिसरी कबर कुणाची?

सातारा –  प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण नुकतेच हटवण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटवताना अफझल खानाच्या कबरीजवळ तिसरी कबर आढळून आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातील एक कबर अफझल खानाची, दुसरी कबर अफझल खानाचा सरदार सय्यद बंडाची, तर तिसरी कबर कुणाची, याबाबतचे पुरावे पुरातत्त्व विभागाकडेही नाहीत, मात्र संभाजी ब्रिगेडने ही तिसरी कबर अफझल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांची असल्याचा दावा केला आहे. यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पहिला वार करणारा अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता. या हल्ल्यानंतर महाराजांनी एका कुलकर्णीचे दोन कुलकर्णी केले होते. कुलकर्णी जागेवरच संपवला होता. त्यामुळे ही कबर कुणाची याचा राज्य सरकारने शोध घ्यावा. छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास जपला पाहिजे. हा सांस्कृतिक दहशतवाद मुक्तीचा इतिहास आहे, असेही ते म्हणाले.