पाकिस्तानी, इराणी, अफगाणी तस्करांना गुजरातची किनारपट्टी इतकी सुरक्षित का वाटते? शिवसेनेचा खोचक टोला

shivsena organized Maha Aarti at dadar kabutar khana hanuman mandir after mns hanuman chalisa pathan event

पाकिस्तानी, इराणी, अफगाणी तस्करांना गुजरातची किनारपट्टी व भूमी इतकी सुरक्षित का वाटत आहे? त्यांच्या पाठीशी कोणती महाशक्ती आहे? तस्करीचा पैसा नक्की कोठे वळवला जात आहे? महाराष्ट्रातील पन्नास आमदारांना गुजरातमध्ये आश्रय दिला हे तर जगजाहीर आहेच. शिवाय त्यांना प्रत्येकी 50 खोकी दिली हे आरोपही सर्रास होतच आहेत. हे हजारो कोटी याच ड्रग्ज तस्करीचा भाग आहेत काय? असे अनेक राष्ट्रहिताचे प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत, असा टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून लगावण्यात आला आहे. मुंबई-महाराष्ट्रातील 10 टक्के कमिशनखोरीवर स्वतःचा बुलबुल वाजविणाऱ्यांनी गुजरातच्या ड्रग्जच्या तस्करीचा पैसा कोठे जातोय यावर बॅण्डबाजा वाजवायला हवा. या पैशाचे धनी कोण, हे भाजपच्या पोपटांनी जाहीर करावे, असंही सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

गुजरातमधील मुंद्रा बंदरातून जून महिन्यात 500 किलोंचे कोकेन जप्त झाले. पाठोपाठ जखाऊ बंदराजवळ 250 कोटींची हेरॉईन तस्करी उजेडात आली. याच काळात पाकिस्तानी बोटींतून 50 किलोचा हेरॉईनचा साठा गुजरातला आणला जात होता. 50 किलो हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 250 कोटी रुपये आहे. मुंद्रा बंदरातून जे 500 कोटींचे कोकेन जप्त केले ते इराणमधून आले. मिठाच्या पिशव्या असल्याचे सांगून ते आणले गेले. ते पकडले गेले असले तरी अशा शेकडो कोटींच्या ‘मिठाच्या पिशव्या’ गुजरातमार्गे देशात गेल्या असतील. गुजरातमधील याच बंदरावरून 15 सप्टेंबर 2021 रोजी तीन हजार किलोचे ‘ड्रग्ज’ पकडले गेले तेव्हा देशभरात खळबळ माजली होती. याच मुंद्रा पोर्टवरील कारवाईत दोन दिवसांपूर्वी 50 कोटी रुपयांची ‘ई-सिगारेट’ नामक नशिली खेप जप्त केली. चीनमधून आलेल्या दोन संशयास्पद कंटेनरमधून ई-सिगारेटची 2 लाख 400 पाकिटे मुंद्रा बंदरात पोहोचली. हिंदुस्थानात ‘ई-सिगारेट’वर बंदी आहे. म्हणजे आता पाकिस्तानबरोबर चीनही गुजरातच्या भूमीवर नशेचा धूर सोडत आहे. मुंबई गुन्हे शाखेने ऑगस्ट महिन्यात गुजरातमधील ‘एमडी ड्रग्ज’ कारखानाच उद्ध्वस्त केला, अशी संपूर्ण तपशीलवार माहिती या अग्रलेखातून देण्यात आलीय.

गोव्यात सोनाली फोगटचा मृत्यू अमली पदार्थाच्या सेवनाने झाल्याचे उघड होताच गोव्याच्या किनारपट्टीवरील ते हॉटेलच पाडण्यात आले व पुढच्या तपासासाठी तेथे सीबीआय पोहोचले, पण गोव्याच्या अनेक किनारपट्टय़ा रशियन, नायजेरियन ड्रग्ज माफियांनी ताब्यात घेतल्या आहेत व तेथे पोलीसही पाय ठेवायला घाबरतात. गोव्यातला ‘ड्रग्ज’ पुरवठा गुजरातमार्गे होतो काय, हा तपासाचा भाग आहे; पण सीबीआयची पथके तपासासाठी गुजरातला पोहोचली नाहीत. ड्रग्ज तस्करी व त्यातील आर्थिक उलाढालीचा तपास करणे हे ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांचे काम आहे, पण हजारो कोटींच्या अमली पदार्थांची तस्करी व व्यवहार उघड होऊनही ‘ईडी’ने त्याची दखल घेतली नाही. आंतरराष्ट्रीय माफियांनी गुजरातमार्गे ड्रग्ज तस्करीचा मोठा गोरखधंदा चालविल्याचे उघड झाले आहे. हे ड्रग्जच्या माफिया पूर्वी पंजाबमार्गे तस्करी करायचे. नंतर दक्षिणमार्गे तस्करी सुरू केली. आता त्यांनी गोरखधंद्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून गुजरातकडे मोर्चा वळवला. ‘नोटाबंदी’नंतर अमली पदार्थांच्या व्यापारास व बनावट नोटा छापण्याच्या धंद्यास आळा बसेल असे आपल्या पंतप्रधानांचे वचन होते, अशी आठवणही करून देण्यात आली आहे.

हे दोन्ही गोरखधंदे चित्त्यांप्रमाणे वेगाने पुढे जात आहेत व त्यांचे मुख्य केंद्र गुजरात बनले आहे. पाकिस्तानी, इराणी, अफगाणी तस्करांना गुजरातची किनारपट्टी व भूमी इतकी सुरक्षित का वाटत आहे? त्यांच्या पाठीशी कोणती महाशक्ती आहे? तस्करीचा पैसा नक्की कोठे वळवला जात आहे? महाराष्ट्रातील पन्नास आमदारांना गुजरातमध्ये आश्रय दिला हे तर जगजाहीर आहेच. शिवाय त्यांना प्रत्येकी 50 खोकी दिली हे आरोपही सर्रास होतच आहेत. हे हजारो कोटी याच ड्रग्ज तस्करीचा भाग आहेत काय? असे अनेक राष्ट्रहिताचे प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत. गुजरात हे ‘ड्रग्ज’चे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र बनले असेल तर महाराष्ट्राला चिंता वाटावी अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होईल. गुजरातमधील बंदरावर कंटेनरमधून भंगार सामानातून अमेरिकन गांजा आणि अफगाणी हेरॉईन मोठ्या प्रमाणात आणण्यात येते. गुजरातच्या सीमा पाकिस्तानला लागून आहेत व तेथे ‘बीएसएफ’ची सुरक्षा व्यवस्था आहे. प. बंगालच्या सीमेवरून प्राण्यांची तस्करी होते व त्या तस्करीत तृणमूल काँग्रेसचे नेते सहभागी असल्याचा आरोप भाजपकडून होताच तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी कडक उत्तर दिले. त्यांनी भाजपला आरसाच दाखवला. सीमेवर बीएसएफ म्हणजे सीमा सुरक्षा दल तैनात आहे. ‘बीएसएफ’ कोणाच्या अखत्यारीत येते? त्यामुळे या तस्करीत कोण सामील आहे व हा तस्करीचा पैसा कोणाच्या खिशात जातोय? अशा फैरी बॅनर्जी यांनी झाडताच भाजपवाल्यांची तोंडे पाहण्यासारखी झाली. गुजरातमधील वाढत्या ड्रग्ज तस्करीने हेच प्रश्न निर्माण केले आहेत, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.