श्रद्धाच्या पत्राची महाराष्ट्र पोलीसांनी दखल का घेतली नाही?, आशिष शेलारांचा सवाल

मुंबई : श्रद्धा वालकर खून प्रकरणात दोन वर्षांपूर्वीचे एक पत्र समोर आले आहे. हे पत्र श्रद्धाने वसई पोलिसांना दिले होते आणि आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यात तिने म्हटले आहे. यावर भाजपा आक्रमक झाली असून महाराष्ट्रातील पोलीस या पत्रावर का कारवाई करत नव्हती. श्रद्धाचे आडनाव वालकर होते म्हणून की तो आफताब होता म्हणून?, असे सवाल भाजपाने उपस्थित केले आहे.

श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020मध्ये आफताबविरोधात वसई येथील तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आफताबपासून जीवाला धोका असल्याचे श्रद्धाने या तक्रारीत म्हटले होते. त्याचबरोबर, तुझ्या शरीराचे तुकडे करून फेकून देईन, अशा धमक्या आफताब देत असल्याचा आरोप श्रद्धाने केला होता. आफताब गेल्या सहा महिन्यांपासून आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण करत आहे. आज त्याने मला ठार मारण्याचाही प्रयत्न केल्याचे श्रद्धाने या तक्रारीत म्हटले होते. तसेच आफताबबरोबर राहण्याची आता इच्छा नसून तो ब्लॅकमेल करत आहे. जर माझे काही बरे-वाईट झाले तर त्यास सर्वस्वी आफताबच जबाबदार असल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते.

याच नराधम आफताबने श्रद्धा वालकरचे 35 तुकडे केले आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आमच्या महाराष्ट्रातील एक भगिनीचा खून आफताबने अतिशय क्रूर पद्धतीने केला. श्रद्धा वालकरने तिच्या जीवाला धोका असून तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन सरकार आणि पोलीस या विषयावर थंड का बसले? जर आमच्या मराठी भगिनीने तिच्यावर होणाऱ्या हल्ल्याची संपुर्ण माहिती दिल्यावर सुद्धा महाराष्ट्रातील पोलिस या पत्रावर का कारवाई करत नव्हती. श्रद्धाचे आडनाव वालकर होते म्हणून की तो आफताब होता म्हणून?, असा सवाल भाजपा मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

सरकारमध्ये बसणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना समर्थन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे होते म्हणून? की या सर्व प्रकारावर पांघरूण घालायचे होते? या सगळ्याची चौकशी होणे ही काळाची गरज आहे, असे सांगून शेलार म्हणाले की, तत्कालीन पोलीस आणि सरकारने कडक कारवाई केली असती तर श्रद्धा आज वाचली असती. माझी पोलिसांना विनंती आहे की, हे पत्र दाबण्यात आले का, याची चौकशी दडपण्यात आली का? आफताबवर कारवाई होऊ नये याबाबत कुणाचे दडपण होते का? या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.