घरCORONA UPDATEठाकरे सरकारवरील नाराजीचा उगम नेमका कुठून?

ठाकरे सरकारवरील नाराजीचा उगम नेमका कुठून?

Subscribe

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. ठाकरे सरकार कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यात पुर्णपणे अपयशी ठरल्याची टीका आता सर्व स्तरातून होत असतानाच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी थेट राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे. तर शरद पवार महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मातोश्रीची पायरी चढले आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर सर्वत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक होत होते, मात्र दोन महिन्यातच ठाकरे सरकार टीकेचे धनी कसे ठरले? ठाकरे सरकारवरील नाराजीचा उगम नेमका कुठून सुरु झाला? याचा मागोवा घेणाऱ्या काही घटना…

दि. ७ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत ज्येष्ठ मंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरे, रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे, शेकापचे जयंत पाटील, बविआचे हितेंद्र ठाकूर आदी नेते उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री स्वतः मातोश्रीवर बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व नेत्यांची मते जाणून घेत होते. इतर नेते, अधिकारी फिल्डवर उतरून काम करत असताना मुख्यमंत्री मात्र मातोश्रीच्या बाहेर येत नसल्यामुळे अधिकारी वर्गात नाराजीचा सूर या बैठकीपासून उमटायला सुरुवात झाली.

- Advertisement -

त्यानंतर २२ मे रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील अनेक नेते उपस्थित झाले होते. या बैठकीत महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवरुन सरकारच्या कारभारावर नाराजी प्रकट केली होती. या दोन्ही बैठकीनंतर ठाकरे सरकारविरोधात सरकारमधीलच घटकांकडून नाराजीचे सूर उमटू लागले.

हे वाचा – गुप्त बैठकीसाठी शरद पवार मातोश्रीवर; महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?

- Advertisement -

त्यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या निर्णय प्रक्रियेपासून लांब असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी बोलत असताना हे महाविकास आघाडीचे सरकार नसून शिवसेनेचे सरकार आहे, अशी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तसेच एप्रिल महिन्यात नागपूर जिल्ह्यातील स्थानिक विषयावरुन प्रशासकीय अधिकाऱ्याशी मतभेद झाल्यानंतर चार मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत ठाकरेंची भेट घेण्यासाठी चकरा मारल्या. मात्र त्यांना मुख्यमंत्री ठाकरेंची भेट मिळाली नाही.

दरम्यान राज्यातील विरोध पक्ष वारंवार राज्यपालांची भेट घेऊन राज्यातील गंभीर परिस्थितीबाबत त्यांना अवगत करत आला आहे. ICMR च्या निर्देशाप्रमाणे मुंबईत कोरोनाच्या चाचण्या होत नाहीत, परिणामी रुग्णसंख्या कमी दाखिवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तर २२ मे रोजी महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारून भाजपने सरकारी अनास्थेवर बोट ठेवले. यातच मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली केल्यामुळे सरकारचे अपयश अधिकाऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचाही आरोप विरोधकांनी केला.

यादरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे कोकणाचा दौरा करुन तेथील जमिनीवरील वास्तव समोर आणत होते. आशिष शेलार हे १४ एप्रिलची गर्दी का झाली? हा प्रश्न उपस्थित करुन स्थलांतरीत मजुरांच्या मागण्याबाबत सरकारला पत्र लिहित होते. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावर सायन आणि राजावाडी रुग्णालयातील कोरोना मृतदेहांची विटंबना, क्वारंटाईन शिक्क्यांमुळे हाताला येणारे फोड आणि ई-पाससाठी चाकरमान्यांना द्यावी लागणारी लाच, असे कैक मुद्दे उपस्थित करुन सरकारला जेरीस आणत होते. विरोधकांच्या या आरोपांना काही प्रमाणात जनतेचे समर्थन मिळू लागले आहे. कारण मुंबईतील आरोग्य स्थिती आता भयावह अशा वळणावर येऊन ठेपली आहे. २५ वर्ष मुंबई महापालिकेत असलेल्या शिवसेनेने आरोग्य व्यवस्था सुधारली नसल्याचा आरोप केला जात आहे.

ठाकरेंचं ‘ते’ वाक्य हास्याचा विषय ठरलं

दरम्यान उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह सुरुवातीच्या काळात चर्चेचा विषय ठरत होते. मात्र नंतर त्यातील फोलपणा लोकांच्या लक्षात आला. तर एका लाईव्हमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आमची तयारी आहे कोरोनासोबत जगण्याची, मात्र कोरोनाची तयारी आहे का आमच्यासोबच जगायची”. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्यावर सोशल मीडियावर अनेक मिम्स तयार झाले आहेत. तर औरंगाबादच्या अपघाताबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मजुरांनी ट्रॅकवर झोपायला नको होते’ या वाक्यावर देखील सामान्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जो युएसपी होता, त्यावरच आता मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -