घरताज्या घडामोडी२० टक्क्यांच्या नेत्याला मुख्यमंत्री करणाऱ्या राज्यपालांची संजय राऊत यांना आठवण का झाली?

२० टक्क्यांच्या नेत्याला मुख्यमंत्री करणाऱ्या राज्यपालांची संजय राऊत यांना आठवण का झाली?

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेचे सदस्यत्व देण्यावरुन सध्या राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरु आहे. यातच खासदार संजय राऊत यांनी “राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है” असे ट्विट केले. एकतर हे राज्यपाल रामलाल नक्की कोण? आणि ते निर्लज्ज असण्यामागे नेमके कारण तरी कोणते? तसेत राऊत कोणता इशारा देऊ इच्छितात? राऊत यांच्या ट्विटमुळे राज्यात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

- Advertisement -

 

कोण होते राज्यपाल रामलाल?

राज्यपाल रामलाल हे हिमाचल प्रदेशचे राजकारणी ठाकूर रामलाल होय. रामलाल हे तब्बल पाच वेळा हिमाचल प्रदेशचे आमदार होते. तर दोन वेळा त्यांनी हिमाचलचे मुख्यमंत्रीपदही भुषवले होते. त्यानंतर त्यांची काँग्रेसतर्फे आंध्रप्रदेशच्या राज्यपाल पदावर वर्णी लागली. १५ ऑगस्ट १९८३ ते २९ ऑगस्ट १९८४ या एक वर्षाच्या कालावधीत रामलाल यांनी आंध्रप्रदेशच्या राजकारणात भुंकप घडवला. यामुळेच संजय राऊत यांनी त्यांचा निर्लज्ज राज्यपाल म्हणून उल्लेख केला.

- Advertisement -

ठाकूर रामलाल राज्यपाल असताना आंध्र प्रदेशात दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि तेलगू देसम पार्टीचे नेते एन.टी. रामाराव मुख्यमंत्री होते. काही दिवसांसाठी रामाराव हे अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी गेले असताना राज्यपाल रामलाल यांनी रामाराव यांच्याच मंत्रिमंडळातील अर्थमंत्री एन. भास्कररवा यांची मुख्यमंत्रीपदावर नियुक्ती केली. राज्यपालाच्या या कृतीमागे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आदेश असल्याचे सांगितले जात होते. विशेष म्हणजे एन. भास्करराव यांच्याकडे सभागृहातील फक्त २० टक्के आमदारांचा पाठिंबा होता. तरिही बहुमत झुगारून राज्यपाल रामलाल यांनी निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली.

एन.टी. रामाराव हे अमेरिकेतून उपचार घेऊन परतल्यानंतर राज्यपालांनी त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या रामाराव यांनी राज्यभर तीव्र आंदोलन छेडले. तब्बल एक महिना हे आंदोलन चालल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी झैलसिहं यांनी ठाकूर रामलाल यांना राज्यपाल पदावरून बडतर्फ केले. त्यानंतर तीन दिवसांतच पुन्हा एकदा रामाराव मुख्यमंत्री झाले.

कोण आहेत भगत सिंह कोश्यारी?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी देखील माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. उत्तराखंडचे विभाजन होण्याअगोदर ते उत्तर प्रदेशच्या विधानपरिषदेचे सदस्य होते. १९९७ मध्ये उत्तराखंडची स्थापना झाल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले आणि त्यानंतर पहिल्या निवडणुकीच्या सहा महिने आधीच त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी टाकण्यात आली. त्यानंतर पाच वर्ष विधानसभेतील विरोधी पक्षनेता, २००७ ते २००९ भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केले. संसदीय मंडळाच्या प्रत्येक सभागृहात त्यांनी पाय ठेवलेला आहे.

कोश्यारी यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जीवन समर्पित केलेल्या नेत्यांमध्ये भगत सिंह कोश्यारी यांचे नाव घेतले जाते. संघ विचारधारेशी घट्ट असलेले कोश्यारी निर्भीडपणे आपले निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

संजय राऊत यांचा राज्यपालांवर राग का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे मुख्यमंत्री पदावर त्यांना केवळ सहा महिने राहता येणार आहे. २८ मे २०२० च्या आधी दोन्हीपैकी एका सभागृहावर त्यांची नियुक्ती न झाल्यास महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त होऊ शकते. त्यामुळे संजय राऊत यांनी आज आंध्रचे राज्यपाल रामलाल यांची आठवण करुन देत राज्यपालांवर  टिकास्त्र सोडले आहे. मात्र रामलाल यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना २० टक्के आमदारांच्या नेत्याला मुख्यमंत्री करायचे आहे का? असे तर राऊत यांना सुचवायचे नसेल का? समझनेवालों को इशारा काफी है! संजय राऊत यांच्या या ओळीचा नेमका अर्थ काय? असे अनेक प्रश्न सध्या उत्पन्न झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रात येत्या दीड महिन्यात घडणाऱ्या घडामोडींतून मिळू शकतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -