गिरीश महाजनांना शिवसेना उत्तर का देत नाही : खडसे

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात. महाजन यांचा टीकेचा रोख राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा शिवसेनेवर अधिक असतो. तरीही शिवसेनेकडून महाजनांना उत्तर दिलं जात नाही. त्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले. महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका करणार्‍या गिरीश महाजनांना शिवसेना उत्तर का देत नाही?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एका बाजूला गिरीश महाजन शिवसेनेला सातत्याने हिणवतात. शिवसेनेवर टीका करतात. आणि दुसर्‍या बाजूला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील महाजनांसोबत चहा घेतात. जेवण करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना म्हणजे गटारीतला बेडूक असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी ही टीका केली. तसेच शिवसेना बेडूक नाही, हत्ती आहे हे महाजनांना दाखवून द्या, असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. एकिकडे गिरीश महाजन हे शिवसेनेला हिणवतात, बेडूक म्हणतात. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पालकमंत्र्यांसोबत चहा घेतात, जेवण करतात. छुपी युती करतात. जळगाव जिल्ह्यातील चित्रं वेगळं आहे. मात्र गिरीश महाजन बेडकाबरोबर कसे जातात ते माहिती नाही. याबाबतचे सविस्तर उत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी देण्याची आवश्यकता आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

काय म्हणाले गिरीश महाजन ?

शिवसेना म्हणजे गटारातील बेडूक आहे. यांनी जगात काय चालले आहे ते बघावे. संपूर्ण देश मोदींकडे बघतो आहे. मोदींवर बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. मोदींना तुमच्यासारख्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असे म्हणत माजीमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अटलजींची भाजप उरली आहे का? या मुद्दावर बोलताना निशाणा साधला आहे.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

दरम्यान, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाजनांवर टीका केली. कोणी कोणाला बेडूक म्हटलं म्हणून माणूस बेडूक होऊ शकत नाही, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यांनी जिल्ह्यापुरतं बोलावं, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. तसेच, कालची सभा ऐतिहासिक सभा होतीय या सभेला 2 लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात देशात काय चालू आहे, तसंच मुंबईच्या बाबतीत विरोधी पक्षाच्या काय भूमिका आहेत, याबाबत स्पष्ट उल्लेख केला. ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांची अ‍ॅक्टिंग केली, जे स्वतःला बाळासाहेब समजायला लागले त्यांना हे प्रत्युत्तर आहे, असंही पाटील म्हणाले