Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण..., जालन्यातील स्थितीबाबत रोहित पवारांची टिप्पणी

नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण…, जालन्यातील स्थितीबाबत रोहित पवारांची टिप्पणी

Subscribe

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली. येथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. काल, शुक्रवारी पोलिसांकडून या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. पोलिसांकडून गोळीबार देखील करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. या घटनेचे हिंसक पडसाद आता राज्यातील विविध भागांमध्ये उमटायला सुरुवात झाली असून या प्रकरणामुळे अनेक जिल्ह्यांत बंदची हाक देण्यात आली आहे.

हेही वाचा – …मग हीच ती दंगल होती का? सवाल करत नितेश राणेंकडून संजय राऊतांच्या चौकशीची मागणी

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी अंबड तालुक्यातील अंकुशनगर, वडिगोद्री या गावांना भेट दिली. यासंदर्भात त्यांनी ट्वीटही केले आहे. उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. या ठिकाणी नागरिकांशी, सामजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता या भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे जाणवले. पोलिसांनी लाठीचार्ज करताना महिला आहेत का पुरुष आहेत, ते बघितले नाही. वयोवृद्ध नागरिकांना व लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आली. उपचार करणाऱ्या डॉक्टरला देखील मारहाण करण्यात आली, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – जालन्यातील मराठा आंदोलन चिरडल्यानंतर संजय राऊतांचे सरकारवर शरसंधान

पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात छर्ऱ्यांचा वापर करण्यात आला. छर्रे लागलेल्या युवकांच्या जखमा बघून आपल्याच नागरिकांवर अशाप्रकारे छर्ऱ्यांचा वापर करता येतो का, हा प्रश्न पडतो, असे सांगून त्यांनी म्हटले आहे की, पुढच्या आठवड्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कुठलाही व्यत्यय नको म्हणून आंदोलन अमानुषपणे चिरडले असल्याची तसेच वरिष्ठांच्या आदेशानेच पोलिसांनी एवढी टोकाची भूमिका घेतल्याची भावना अनेक युवकांनी व्यक्त केली.

- Advertisment -