काँग्रेसचं सरकार आल्यानंतर गडकरींना मंत्रिपद? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Supriya Sule | नितीन गडकरी चांगले मंत्री आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मुंबई – काँग्रेसचं सरकार आल्यानंतरही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मंत्री करणार का? असा प्रश्न विचारल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत चलाखीने उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी गडकरींच्या कामाचंही कौतुक केलं आहे. एका युट्यूबरने घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

हेही वाचा – मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांच्या बैठकीत काय चर्चा होणार?

अमेरिकेत ओबामा यांनी बुशच्या काळातले संरक्षण मंत्री बदलले नव्हते. त्यामुळे भविष्यात केंद्रात काँग्रेसचं सरकार आल्यानंतरही नितीन गडकरी यांच्याकडे मंत्रिपद ठेवलं पाहिजे, असा सूचनावजा प्रश्न मुलाखतकाराने विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी त्यांच्यासाठी सर्वांत उत्तम कॉम्प्लिमेंट आहे. मी नितीन गडकरी यांच्याशी बोलेन. हे असं खरंच शक्य आहे याबाबत विचारेन. नितीन गडकरी चांगले मंत्री आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे.

२०२४ च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास दीड ते दोन वर्षे आहेत. या निवडणुकांसाठी सर्व भाजपाविरोधातील प्रादेशिक पक्षांशी एकत्रित लढण्यासाठी चर्चा केली जाणार आहे, असंही सुप्रिया सुळेंनी या मुलाखतीत स्पष्ट केलं. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काय केलं असा प्रश्न भाजपाकडून सातत्याने विचारला जातोय. मात्र, याच काळात बनलेल्या शिक्षण संस्थांमध्ये ते शिकलेत ही गोष्ट ते विसरतात, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा – मुंबईत थंडी वाढली; किमान तापमान १५ अंशाखाली जाण्याची शक्यता

मिर्झापूर आवडती सीरिज

राजकारणी मंडळींना मनोरंजनासाठी वेळ नसतो. मात्र, आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत सुप्रिया सुळे यांनी मिर्झापूर ही वेबसीरिज पाहिलं असल्याचंही या मुलाखतीत सांगितलं. एवढंच नव्हे तर ही वेबसीरिज आवडल्याने त्यांनी या सीरिजमधील कालिन भैय्या म्हणजेच पंकज त्रिपाठींनाही फोन करून त्यांच्या कामाचं कौतुक केलं.