मलिक, देशमुखांना मिळणार का बहुमत चाचणीसाठी मतदानास परवानगी? सुप्रीम कोर्टाचा 5 वाजता निकाल

बंडखोर शिंदे गटाने शिवसेनेच्या 39 सह अपक्षांची साथ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गटात 50 आमदार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या चाचणीत महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे नक्की आहे

will nawab malik and anil deshmukh vote during th two mla floor tests supreme court verdict at 5 pm

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. यात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला उद्या विधानभवनात बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील सध्या तुरुंगात असलेले दोन आमदारांनी बहुमत चाचणीतील मतदानास हजर राहण्याच्या परवानगीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख मतदानाला हजर राहण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोर्टाने या याचिकेवर आज संध्याकाळी 5 वाजता सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाला मात्र शिवसेनेने आव्हान दिले आहे, ही चाचणी रोखली जावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या याचिकेवरही संध्याकाळी 5 वाजता सुनावणी पार पडणार आहे. याचवेळी महाविकास आघाडीमधील आमदार नवाब मलिक आणि आमदार अनिल देशमुख यांच्या याचिकेवरही निकाल दिला जाईल असे कोर्टाने म्हटले आहे.

मागील राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेसही नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी मतदान करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली होती. मात्र कोर्टाने तेव्हाही त्यांना मतदानासाठीची परवानगी नाकारली, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीच्या मतदानासाठी तरी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना परवानगी मिळते की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी सध्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख दोघेही तुरुंगात आहेत. ईडीमार्फत दोघांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी आता एका एका मताची गरज आहे. शिवसेनेतून 39 आमदार फुटल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीत शिवसेनेसाठी एक एक मत महत्त्वाचे आहे. बंडखोर शिंदे गटाने शिवसेनेच्या 39 सह अपक्षांची साथ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गटात 50 आमदार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या चाचणीत महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे नक्की आहे.


असदुद्दीन ओवैसींना मोठा फटका; ४ आमदारांचा पक्षाला रामराम, ‘आरजेडी’त केला प्रवेश