घरमहाराष्ट्रअकरावी प्रवेशासाठी सीईटी घेणार

अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेणार

Subscribe

दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत अपेक्षित; विद्यार्थ्यांसाठी परीक्षा असणार ऐच्छिक

दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावीचे प्रवेश कशापद्धतीने होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम होता. त्यामुळे अकरावीला सरसकट प्रवेश देण्यात यावा, तर अकरावीसाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याची मागणी होऊ लागली. या सर्व बाबींचा विचार करून अखेर शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत घोषीत होण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील दोन आठवड्यांमध्ये म्हणजे जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ऐच्छिक असणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इयत्ता 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे दहावीचा निकाल कशापद्धतीने लावणार, अकरावीचे प्रवेश कशा पद्धतीने होणार, असे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित करण्यात आले होते. मात्र, मूल्यमापन पद्धतीनुसार दहावीचे निकाल जाहीर करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशामध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. याचा विचार करून शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता 11 वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई व अन्य आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

ही परीक्षा शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार असून, त्यासाठी विशेष समितीची स्थापना केली आहे. परीक्षा केंद्रांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशासाठीची सीईटी ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असल्याने, दहावीचा निकाल लागल्यानंतर राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा देण्यासंदर्भातील पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा अर्ज भरलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेले असल्याने त्यांना सीईटीसाठी शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसई, आयसीएसई व अन्य आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून निश्चित केलेले शुल्क भरावे लागणार आहे.

कशी असेल परीक्षा
सीईटी परीक्षा राज्य मंडळाच्या इयत्ता 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. सीईटी परीक्षा 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असेल व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप हे वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे असून, परीक्षा ओएमआरवर आधारित असेल.

- Advertisement -

कसे होणार प्रवेश
इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रिया राबवताना सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सीईटी गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. इयत्ता 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर त्यांना इयत्ता 10 वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील. गतवर्षी इयत्ता 11 वी प्रवेशासाठी उपलब्ध जागांपैकी सुमारे 32 टक्के जागा रिक्त राहिलेल्या होत्या.

विशेष समितीची स्थापना
सीईटी परीक्षा घेण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये राज्य मंडळाचे अध्यक्ष, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, बालभारतीचे संचालक, परीक्षा परिषदेचे आयुक्त यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक यांची सदस्य सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.

विभागनिहाय अकरावीच्या जागा

विभाग प्रवेश क्षमता झालेले प्रवेश रिक्त जागा
अमरावती 15360 10950 4410
औरंगाबाद 31470 16948 14522
मुंबई 320779 224695 96084
नागपूर 59250 34834 24416
नाशिक 25270 19712 5558
पुणे 107215 71722 35493
एकूण 559344 378861 180483

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -