प्रेमानंद बच्छाव
मुंबई : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात जातीय संघर्ष टोकाला गेला असून एका समाजाचे लोक दुसऱ्या समाजाच्या दुकानातही जायला तयार नाहीत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर हा संघर्ष आणखीन तीव्र झाला आहे. मराठवाड्यातील हे चित्र काहीही करुन आपणाला बदलायचे आहे. त्यासाठी बीड, परभणीसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील गावांत जाऊन दोन्ही समाजातील लोकांना एकत्र घेऊन त्यांच्याशी संवाद साधून हा संघर्ष निवळण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी येथे केले. (will take the initiative to resolve the conflict in Marathwada NCP President Sharad Pawar said in a meeting)
शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत पवार यांनी पदाधिकाऱ्यांकडून विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे जाणून घेतली. तसेच राज्यातील राजकीय, सामाजिक परिस्थितीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मराठवाड्यात निर्माण झालेल्या सामाजिक संघर्षाच्या परिस्थितीवर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.
हेही वाचा – Jayant Patil : प्रभागातील मतांची माहिती द्या…पद सोडतो; राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे आव्हान
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे नाव देण्यावेळीही मराठवाड्यात सामाजिक संघर्ष निर्माण झाला होता. सुरुवातीला विद्यापीठ नामांतराचा निर्णय घेताना आम्ही तेथील नेत्यांना किंवा लोकांशी चर्चा न करता निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याठिकाणी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या निर्णयाची मोठी किंमत आम्हाला निवडणुकीत चुकवावी लागली.
त्यानंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर विद्यापीठ नामविस्ताराचा निर्णय घेताना मी मराठवाड्यातील अनेक महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन, तेथील लोकांशी चर्चा करुन नामविस्ताराचा निर्णय घेतला. त्यानंतर मराठवाड्यातील सामाजिक संघर्ष निवळला. त्याच प्रकारे सध्या मराठवाड्यातील सामाजिक संघर्ष कमी करण्यासाठी तेथील गावांना भेटी देऊन, लोकांना एकत्र आणून त्यांच्यात संवाद घडवून आणायला हवा. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपण पुढाकार घ्यायला हवा, असे पवार म्हणाले.
हेही वाचा – Maharashtra : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची मदत; मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती
महिलांना ५० टक्के संधी देणार
विधानसभा निवडणुकीतील पराभवाने कार्यकर्त्यांनी नाउमेद होऊ नये. कार्यकर्त्यांनी विधानसभेतील पराभव विसरुन आगामी स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक गांभीर्याने घ्यावी. आगामी निवडणुकीत महिलांना ५० टक्के संधी दिली जाईल. त्यापैकी निम्मी तिकिटे ही सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना दिली जातील. तसेच स्थानिक निवडणुकीत सर्वसामान्य कुटूंबातील युवकांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट करत शरद पवार यांनी आगामी काळात पक्षात नव्या नेतृत्वाची फळी उभी करणार असल्याचे संकेत दिले.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar