भाजपाच्या दोन प्रदेशाध्यक्षांमुळे शिंदे गटासाठी आगामी निवडणूक ठरणार सत्तेचा ‘चंद्र’?

high court on Shinde Fadnavis government
high court on Shinde Fadnavis government

मुंबई : भाजपाने मोठी खेळी करत शिवसेनेत उभी फूट पाडली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देत राज्यात सत्ता स्थापन केली. पण या सर्व राजकीय नाट्यात शिंदे गटाचे स्थान काय? हा प्रश्न जवळपास नऊ महिन्यांनंतरही कायम आहे. लागोपाठच्या दोन भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे आगामी निवडणूक शिंदे गटासाठी सहजसाध्या नसेल, तो सत्तेचा ‘चंद्र’ ठरेल का, असा प्रश्न निर्माण होतो.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी जवळीक केल्याचे सांगत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 तर अपक्ष 10 आमदारांनी ‘उठाव केला. या उठावामागे भाजपा असल्याचे खुद्द एकनाथ शिंदे यांनीच नंतर स्पष्ट केले. या उठावामुळे ठाकरे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्याला आता जवळपास नऊ महिने झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभेसाठी ‘मिशन 200’ आणि लोकसभेसाठी ‘मिशन 45’चा संकल्प केला.

तर, काल (शनिवारी) भाजपाच्या विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 240 जागांवर लढण्याचे भाजपाचे नियोजन असल्याचे सांगितले. यापैकी 40 जागा रालोआतील इतर मित्रपक्षांना तर, उर्वरित 48 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्याचे संकेत त्यांनी दिले. शिंदे गटाकडे 50पेक्षा नेते नसल्यामुळे त्यांना अधिक जागा जाणार नाहीत, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, यापूर्वी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानही चंद्रशेखर बावनकुळे यांनी, जोपर्यंत मी प्रदेशाध्यक्ष आहे, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे वक्तव्य केले होते.

भाजपाने शिंदे गटाला असे गृहित धरणे अपेक्षितच होते. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच, शिवसेनेचे 40 आणि अपक्ष मिळून आज माझ्या सोबत 50 आमदार आहेत. यातील एकही आमदार मी निवडणुकीत पराभूत होऊ देणार नाही, अशी विधानसभेत ग्वाही दिली आहे. जुलै 2022मध्ये सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही ग्वाही दिली होती.

तथापि, बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्ते केली होती. त्यामुळे बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला. आतापर्यंत राज्यात युतीला जेवढे बहुमत मिळाले नाही, तेवढे बहुमत आम्ही मिळवणार आहोत. आम्ही तशी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. तेवढीच क्लिप व्हायरल करण्यात आली. अजून जागावाटपाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही, अशी सारवासारव नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

विशेष म्हणजे, भाजपाच्या आधीच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील शिंदे गटाबद्दल अशाच प्रकारची भावना व्यक्त केली होती. अक्षरश: मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, असे वक्तव्य भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जुलै महिन्यात पनवेलमध्ये झालेल्या भाजपा कार्यकारिणीत केले होते. त्यावरूनही वादंग निर्माण झाल्यावर, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. सगळ्यांना अस वाटत होते, आपलेच सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहे. मात्र, अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने धक्का बसला, असे त्यांना म्हणायचे असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर पडदा टाकला.

एकूणच, आता जरी सत्तेत असले तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला आगामी निवडणूक ‘चंद्रा’सारखीच दुर्लभ ठरते की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.