‘खोके सरकार’ प्रायश्चित्त घेणार का? महावितरणच्या कारभारावरून ठाकरे गटाचा सवाल

saamana editorial shiv sena uddhav thackeray slams shinde fadanvis govt over punjab minister resigns after allegations

मुंबई : असंख्य अडचणींशी लढा देत शेतकऱ्याने मोठ्या उमेदीने रब्बीचा हंगाम फुलविला आहे. मात्र महावितरण नावाची ‘टोळधाड’ रब्बीचे पीकही उद्ध्वस्त करीत आहे. सरकार म्हणते, ‘फुकाच्या गप्पा मारीत नाही. वीजबिल थकबाकीसाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही.’ महावितरण म्हणते, ‘वीज बिल भरा, नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची ‘सुरी’ फिरवू.’ मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार हा असा सुरू आहे. या कारभाराच्या कचाट्यात सापडलेल्या बळीराजाने जगायचे कसे? नगर जिल्ह्यातील पोपट जाधव या शेतकऱ्यांची आत्महत्या ही महावितरण नावाच्या ‘पठाणी टोळी’ने घेतलेला बळी आहे. खोके सरकार त्याचे प्रायश्चित्त घेणार का? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात महवितरणच्या कारभाराबरोबरच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर शरसंधान करण्यात आले आहे. राज्यात खोके सरकार आल्यापासून महाराष्ट्राची सर्व बाबतीत घसरणच सुरू आहे. राज्यकर्ते कितीही ‘सकारात्मक’ वगैरे वातावरणाचे दावे करीत असले तरी राज्यात त्याच्या विपरीतच घडत आहे. उद्योग-व्यवसाय राज्याबाहेर जात आहेत. गोवरची साथ आटोक्यात आलेली नाही. शेतकरी आधी अतिवृष्टी आणि महापुराच्या तडाख्यात सापडला होता. आता तो मिंधे सरकारच्या तावडीत सापडला आहे, अशी टीका ठाकरे गटाने या अग्रलेखातून केली आहे.

सरकार शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का आणते?
या सरकारच्या कारभाराने राज्यातील आणखी एका थकबाकीपीडित शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. नगर जिल्ह्याच्या अकोळनेर येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव यांनी सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. वीज बिलाच्या थकबाकीचे कारण देत महावितरणने पोपट जाधव यांचे वीज कनेक्शन तोडले होते. वीज नसल्याने शेतात उभ्या असलेल्या रब्बी पिकाचे नुकसान ते पाहू शकले नाहीत. अखेर त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि स्वतःला संपवून घेतले. शेतकरी कर्जबाजारीग्रस्त असो की थकबाकीपीडित, त्याने मृत्यूला कवटाळू नये हे खरे असले तरी त्याच्यावर ही वेळ का येते? सरकार त्याच्यावर ही वेळ का आणते? या प्रश्नांचीही उत्तरे मिळायला हवीत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

सरकारला फक्त खोक्यांचीच भाषा कळते!
मुळात हे सरकार स्वतःच मिंधे आहे. त्याला फक्त खोक्यांचीच भाषा कळते. त्यांना त्यांच्याच कारभारामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेल्या अश्रूंची भाषा काय कळणार? तीन दिवसांपूर्वी बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यात आम्ही याच प्रश्नावरून राज्य सरकारच्या पाठीत आसूड ओढला होता. त्याच्या फटकाऱ्याने अस्वस्थ झालेल्या सरकारने ‘शेतकऱ्यांनी फक्त चालू वीज बिल भरावे. थकबाकीसाठी कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही, असे पत्रकच जारी केले असून तसे आदेश वीज कंपनी, महावितरणला दिले आहेत,’ असा खुलासा केला होता. ऊर्जा खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही ग्वाही दिली होती. मात्र या आश्वासनावरच पोपट जाधव यांच्या आत्महत्येने आता प्रश्नचिन्ह लावले आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई किती मिळाली?
वीज कनेक्शन तोडायचे नाही, असे सरकारचे आदेश आहेत तर मग जाधव यांची वीज कशी तोडली गेली? फुकाच्या वगैरे गप्पा आपण मारीत नाहीत, असे म्हणणाऱ्यांचे शब्द आता कुठल्या हवेत विरले? शासनाचे पत्रक महावितरण जुमानत नाही, असाच या घटनेचा अर्थ आहे. खरीपाचे पीक अतिवृष्टी आणि महापुरामुळे उद्ध्वस्त झाले. त्याच्या नुकसानभरपाईच्या मोठमोठ्या गप्पा मिंधे सरकारने मारल्या. नुकसानभरपाईचे आकडेही फुगवून सांगितले. प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांच्या खात्यात त्यातील किती रक्कम जमा झाली, असा सवालही ठाकरे गटाने केला आहे.