मुंबई : अमरावतीमधील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडिया’ आणि ‘भारत’ वादावरून ठाकरे गटाला लक्ष्य केले. ‘भारत माता की जय’ म्हणायला चांगले वाटते की, ‘इंडिया माता की जय’ म्हणायला, असा सवाल उपस्थितांना केला होता. त्याला ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अमरावतीत तुम्ही इंडिया शब्दाची आपली खदखद व्यक्त केलीत. ‘इंडिया’ या शब्दाची आपल्याला ऍलर्जी आहे हे कळायला तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला ७५ वर्षे लागली @Dev_Fadnavis जी! जग भारतीयांना ‘इंडियन’ म्हणून ओळखतात, त्यामुळे ‘इंडिया’ ही संकल्पना जगपरिचित आहे, हे माहीत असू द्या! डॉ.…
— Ambadas Danve (@iambadasdanve) September 10, 2023
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी रविवारी अमरावतीमध्ये आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सव कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवले असून, अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तेव्हा ‘भारत माता की जय’ म्हणायला किती चांगले वाटते; पण ‘इंडिया माता की जय’ म्हणायला चांगले वाटते का, असा प्रश्न विचारत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीला टोला लगावला.
हेही वाचा – ढोंगीपणाचीही सीमा असते… ‘भारत’ नावावरून संजय राऊत यांचा भाजपावर निशाणा
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत, त्यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. अमरावतीत देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडिया’ शब्दाबद्दलची खदखद व्यक्त केली. ‘इंडिया’ या शब्दाची आपल्याला ऍलर्जी आहे, हे कळायला तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला 75 वर्षे लागली, असा टोला त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा – फसवणूक आणि लुच्चेगिरीची नऊ वर्षे… ठाकरे गटाची मोदी सरकारवर कडाडून टीका
जग भारतीयांना ‘इंडियन’ म्हणून ओळखतात, त्यामुळे ‘इंडिया’ ही संकल्पना जगपरिचित आहे, हे माहीत असू द्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ‘We are Indians, firstly and lastly’. मग त्यांच्या या महान संदेशातून तुम्ही ‘Indians’ शब्द काढणार आहात का? असा थेट सवालही त्यांनी फडणवीस यांना केला आहे.