यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Vidhan_Bhavan

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये होतं. मात्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे अधिवेशन मुंबईत घेण्याचे नक्की केलं आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार की मुंबईला यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील अधिवेशनाबाबत मतभेद दिसून येत होतं.

अखेर गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अधिवेशनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. विधिमंडळ हिवाळी अधिवेशन येत्या २२ ते २९ डिसेंबरला मुंबईत करण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे. सोमवारी संसदीय कामकाज समितीची बैठक होणार आहे त्यात या तारखांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

हिवाळी अधिवेशन हे ७ डिसेंबरपासून होणार होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने हे अधिवेशन मुंबईतच होणार असल्याची दाट शक्यता होती. शिवसेनेचा सुरुवातीपासूनच नागपूर अधिवेशनाला विरोध होता. मात्र, काँग्रेस आणि भाजप हिवाळी अधिवेशन नागपूरलाच घ्यावे यासाठी आग्रही होतं. त्यामुळे अधिवेशन नागपूरला घ्यावं की मुंबईला यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद होते. अखेर हे अधिवेशन मुंबईतच होणार आहे.