नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस हा देखील शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून गाजला. विरोधकांना आज पुन्हा या मुद्द्यावरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर सरकारला शेतकऱ्यांना एक आणि दोन रुपये देताना लाज वाटली पाहिजे, असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर ओढावलेल्या समस्येबाबत चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांच्याकडून सभागृहात करण्यात आली. त्यांच्या या मागणीला उत्तर देत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवकाळी पाऊस, मराठा आरक्षण, कांदा उत्पादक शेतकरी तसेच इतर सर्व विषयांवर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन विरोधकांना दिले. पण सरकारकडून सकारात्मक उत्तर न आल्याने विरोधकांनी कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी सभात्याग केला. (Winter Session: Unseasonal rain, all issues including Maratha reservation will be discussed, Ajit Pawar)
हेही वाचा – Winter Session : “सरकारला लाज वाटली पाहिजे…”, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विजय वडेट्टीवार संतापले
अवकाळी पाऊस, दुधउत्पादक, संत्रा उत्पादक, कापूस उत्पादक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, कांदा निर्यातीवरील बंदी, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी, मराठा आरक्षण यांसारख्या सर्व महत्वाच्या मुद्यांवर सभागृहात चर्चा करुन त्यातून सर्वसहमतीने मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे, असे स्पष्ट आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. कांदा निर्यात आणि इथेनॉलनिर्मिती प्रश्नांवर गरज पडल्यास केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढण्यात येईल. दुध उत्पादक प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले.
विधानसभेत विरोधी पक्षांकडून मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर सदस्यांना आश्वासित करताना अजित पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा असून त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अवकाळी पाऊस, दुध उत्पादक, संत्रा उत्पादक, कापूस उत्पादक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेण्यात येईल. ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदीमुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याप्रश्नी लक्ष घालून यातून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या शनिवारी किंवा रविवारी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. गरज पडल्यास पुढील आठवड्याच्या सुरुवातीला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिल्लीला जावून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांची भेट घेऊन यातून निश्चितपणे मार्ग काढला जाईल, अशी माहितीही अजित पवार यांच्याकडून सभागृहात देण्यात आली.
दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज लागणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. मुख्यमंत्र्यांना वेळेअभावी बैठक घेणे शक्य नसल्यास, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आपण स्वत: दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह येत्या मंगळवारी बैठक घेऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला दिला. परंतु, तरी देखील या सर्व प्रश्नांवर आजच तातडीची चर्चा करण्यात यावी, कारण ही जर का चर्चा झाली नाही तर आणखी काही शेतकरी आत्महत्येसारखा मार्ग निवडतील, अशी खंत विरोधकांनी उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर व्यक्त केली.