महारेरा नोंदणीशिवाय जाहिराती करणाऱ्या १४ गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस

यात मुंबई लगतच्या भागातील ५ , पुणे, नागपूर परिसरातील प्रत्येकी ३, नाशिक परिसरातील २ आणि औरंगाबाद परिसरातील १ बिल्डरचा समावेश आहे.

Maharera

मुंबईसह इतर शहरांत स्वतःचं घर घेणे हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. त्यासाठी काटकसर, पदरमोड, पै-पै जमवत, कधी-कधी कर्ज काढून घर घेण्याचा प्रयत्न करतात. अशात अनेक बिल्डरांकडून फसवणूकही केली जाते. यावर आळा घालण्यासाठी आणि बांधकाम व्यवसायात पारदर्शकता यावी यासाठी महारेराची स्थापना करण्यात आली. पण या महारेराच्या नोंदणी क्रमांकाशिवाय प्रकल्पांच्या काही जाहिराती प्रसिद्ध होत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. महारेराने याची गंभीर दखल घेतली असून या प्रकल्पांना नोटिसा पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध वर्तमानपत्रांत महारेरा क्रमांकाशिवाय प्रसिद्ध होणाऱ्या अशा जाहिराती महारेराच्या निदर्शनास आल्या. याची नोंद घेऊन जवळपास १४ प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटीसेस बजावल्या आहेत. या सर्वांना आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या विहीत मुदतीत चुकांची दुरूस्ती करणे अपेक्षित असून उचित प्रतिसाद न देणाऱ्या विकासकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यात मुंबई लगतच्या भागातील ५ , पुणे, नागपूर परिसरातील प्रत्येकी ३, नाशिक परिसरातील २ आणि औरंगाबाद परिसरातील १ बिल्डरचा समावेश आहे.

महारेरा नोंदणी क्रमांक असल्याशिवाय कुठल्याही विकासकाला प्रकल्पाची कुठल्याही प्रकारची जाहिरात, त्या प्रकल्पातील घरांची नोंदणी, विक्री, खरेदी करता येत नाही . असे असले तरी काही बिल्डर या नियमाकडे कानाडोळा करून महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय किंवा ‘महारेरा नोंदणीकृत’ असे फक्त लिहून सर्रास जाहिराती करीत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. महारेराने अशा सर्व प्रकल्पांवर बेधडक कारवाई सुरू केलेली आहे.

स्थावर संपदा कायद्यानुसार ५०० स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त किंवा ८ सदनिकांचा कुठलाही प्रकल्प ( यात प्लॉट्सचाही समावेश आहे) असल्यास त्याची महारेराकडे नोंदणी असणे अत्यंत आवश्यक आहे. याची नोंद आपली गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित राहावी, यासाठी घर खरेदीदारांनी घेणे आवश्यक आहे. म्हणून घरखरेदीदार आणि स्थावर संपदा क्षेत्रातील तत्सम गुंतवणूकदारांनी महारेरा नोंदणीक्रमांक नसलेल्या प्रकल्पांत गुंतवणूक करण्याचं टाळावं, असं आवाहन महारेराच्या वतीने करण्यात आलं आहे.

तसंच घर खरेदी करताना ग्राहकांनी आधी प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे ना ? महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख दिलेली आहे ना? घर खरेदीकरार महारेराने ठरवून दिलेल्या आदर्श घर खरेदी करारानुसारच आहे ना? तुम्ही १० टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घरखरेदी, घर नोंदणी करीत असल्यास बिल्डरकडून घर विक्री करार मिळतंय ना? आणि ज्यांच्यामार्फत हा व्यवहार करताय ते मध्यस्थ महारेरांकडे नोंदणीकृत आहेत ना? या सर्व बाबींची खात्री करून घ्यायला हवी. तुमची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी हे आवश्यक असल्याचं देखील महारेराकडून सांगण्यात आलं आहे.