संसारात सासूची लुडबूड; सूनेने सासूचे तंगडेच मोडले

संसारात लुडबूड होत असल्याने रागाच्या भरात सूनेने सासूला चक्क मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे.

woman beating mother in law at pune
संसारात सासूची लुडबूड; सूनेने सासूचे तंगडेच मोडले

सासूच्या धाकामुळे भल्याभल्या सूनांचे हसू पळून जाते. तसेच सासूला उलट बोलण्याची अनेक महिलांची हिंमत देखील नसते. मात्र, सध्याच्या काळात सूनच सासूवर भारी पडत असल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या विश्रांतवाडीत सासूची संसारात लुडबूड होत असल्याने रागाच्या भरात सूनेने सासूला चक्क मारहाण केली आहे. यामुळे सासूचा गुघडा फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी सविता अविनाश शिंदे (३०) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; विश्रांतवाडीतील राम मंदिराशेजारी शिंदे कुटूंबिय राहायला आले होते. त्यांचा मुलगा, सून, सासू-सासरा, नातवंडे असा परिवार आहे. किरकोळ कारणामुळे सून सविता आणि सासू मालती यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. त्यामुळे सविताला सासूचा राग येत होता. सततचे टोमणे आणि किरकोळ कारणांवरुन त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. त्याचा राग आल्यामुळे सविताने १८ सप्टेंबर रोजी सासूला तुझ्यामुळे माझा संसार होत नाही, असे म्हणत लाथा-बुक्क्यांनी बदडण्यास सुरुवात केली. सुनेने अचानक हल्ला केल्यामुळे मालती खाली पडल्या. त्यामुळे त्यांच्या गुडघ्याला जखम झाली. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता तपासणीअंती सुनेच्या मारहाणीत मालती यांचा गुडघा फ्रॅक्चर असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी सविताविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर तपास करीत आहेत.


हेही वाचा – शिवीगाळ खून केल्या प्रकरणात आरोपीला १० वर्षांचा कारावास