भरधाव वाहनाच्या चाकाखाली सापडल्याने दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२४) रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास मेरी रासबिहारी लिंकरोडवरील प्रमोद महाजन गार्डनजवळ घडली. या घटनेमुळे रासबिहारी-मेरी लिंक रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती. क्रांती धनंजय पाटील (वय ४८, रा. श्री गजानन निवास, कलानगर, दिंडोरी रोड, पंचवटी)असे मृत महिलेचे नाव आहे. (Woman crushed by heavy vehicle)
पोलिसांच्या माहितीनुसार, धनंजय पाटील व त्यांच्या पत्नी क्रांती धनंजय पाटील हे दोघे दुचाकीवरून आरटीओ ऑफिसकडून रासबिहारी लिंकरोडने बळीमंदिरच्या दिशेने जात होते. त्यांची दुचाकी प्रमोद महाजन उद्यानाजवळील परिसरात आली. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दुचाकीस्वार क्रांती पाटील रस्तावर पडल्या आणि पती व दुचाकी रस्त्याच्याकडेला फेकले गेले. दरम्यान, क्रांती पाटील यांच्या अंगावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाहन मृत महिलेच्या अंगावरून गेल्याने महिलेच्या शरीराचा चेंदामेंदा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले तर अरुंद रस्ता व अंधाराचे साम्राज्य असल्याने याठिकाणी दररोज अपघात घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
- रस्ता रुंदीकरण न करता रस्त्याला टाकलेले दुभाजक तसेच रस्त्यावर असलेले मोठे खड्डे त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
- गेल्या अनेक दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करून देखील अधिकाऱ्यांची डोळेझाक
- महामार्गावरून शहरातील विविध ठिकाणी जाण्यासाठी अवजड वाहनांचा मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर होत असल्याचे दिसते.
- परिसरात शाळा व महाविद्यालय असल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची वर्दळ असते भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तात्काळ रस्तारुंदीकरण करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने घेतला निष्पाप महिलेचा जीव