पोलीस शिपायाने केला महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार

पिंपरी-चिंचवडमध्ये महिला पोलिसावर पोलीस कर्मचाऱ्यानेच केला बलात्कार

Rape
प्रातिनिधिक छायाचित्र

पोलीस शिपायाने महिला पोलीस कर्मचाऱ्याला वडील आणि बहिणीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची गंभीर घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेप्रकरणी आरोपी शुभम गजानन मोहिते याला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेप्रकरणी २६ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी शुभमवर अॅट्रॉसिटी आणि बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नासाठी मागणी घातली होती. याला फिर्यादीने नकार दिला. ‘माझ्यासोबत लग्न न केल्यास बहीण आणि वडिलांना ठार मारेन’, अशी धमकी शुभमने दिली होती. यामुळे फिर्यादी घाबरल्या होत्या. त्यांना जबदस्तीने सोबत फिरण्यास नेऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न शुभम करू लागला. तेव्हा, फिर्यादी महिलेने प्रतिकार केला. त्याला न जुमानता आरोपीने बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर फिर्यादी महिलेने लग्न करण्यासंबंधी विचारणा केल्यानंतर आरोपी शुभम हा टाळाटाळ करू लागला. त्याने लग्नास नकार दिला. पोलिसात तक्रार केली तर वडील आणि बहीण यांची सरकारी नोकरी घालवण्याची धमकी देखील शुभमने दिली. शुभम हा मोटार वाहन परिवहन विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. या घटनेप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कदम हे अधिक तपास करत आहेत.