Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Women's Day : नागालॅण्डमध्ये महिला मंत्र्याचे पंतप्रधानांकडून कौतुक, महाराष्ट्रात महिला मंत्री कधी?

Women’s Day : नागालॅण्डमध्ये महिला मंत्र्याचे पंतप्रधानांकडून कौतुक, महाराष्ट्रात महिला मंत्री कधी?

Subscribe

मुंबई : नागालॅण्डमध्ये महिला आमदार सलहौतुओनुओ क्रूसे यांनी आज, मंगळवारी मंत्री म्हणून शपथ घेतली. नागालॅण्डमधील त्या पहिल्याच महिला मंत्री आहेत. त्यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. उद्याच्या (बुधवार) महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या घटनेला विशेष महत्त्व आहे. पण नागालॅण्डसारख्या राज्याला जे जमले ते महाराष्ट्राला जमलेले नाही. राज्यात सत्तांतर होऊन आठ महिने झाले तरी, अद्याप मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान मिळालेले नाही.

ईशान्येकडील नागालँड विधानसभेत (Nagaland Assembly) गेल्या 60 वर्षांत 14 विधानसभा निवडणुका झाल्या. पण त्यात एकही महिला आमदार निवडून येऊ शकली नव्हती. मात्र, यावेळी इतिहास घडला. नागालँडच्या विधानसभेत एक नव्हे तर, दोन महिला पोहोचल्या. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (एनडीपीपी) हेकानी जाखलू (Hekani Jakhalu) या राज्यातील पहिल्या महिला आमदार बनल्या. त्यांच्यापाठोपाठ एनडीपीपीच्याच सलहौतुओनुओ क्रुसे विजयी झाल्या.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिलाँगमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेफ्यू रिओ यांनी आज, मंगळवारी मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा उपस्थित होते. त्यांच्याव्यतिरिक्त 11 आमदारांचाही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यात सलहौतुओनुओ क्रुसे यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांनी क्रूसे यांचे अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 14 महिला आमदार

- Advertisement -

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दोन्ही पक्षांचे मिळून 14 महिला आमदार आहेत. शिवसेनेच्या यामिनी जाधव (भायखळा), गीता जैन (मीरा-भाईंदर) आणि लता सोनवणे (चोपडा) तर, भाजपाच्या मंदा म्हात्रे (बेलापूर), मनिषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), भारती लव्हेकर (वर्सोवा), माधुरी मिसाळ (पर्वती), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), श्वेता महाले (चिखली) मेघना बोर्डीकर (जिंतूर), नमिता मुंदडा (केज) आणि मोनिका राजळे (शेवगाव) या आमदार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत येऊन आठ महिने उलटले तरी, अद्याप एकही महिला आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. उद्याच्या (बुधवार) महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे.

शिवसेनेची मुंबई तरीही मंत्रिमंडळात मराठी चेहराच नाही
गेल्या ऑगस्ट महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. शिंदे गट आणि भाजपा या दोघांकडून प्रत्येकी 9-9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण यात मुंबई आणि मुंबईतील मराठी चेहऱ्याला प्रतिनिधित्वच देण्यात आल्याचे दिसले नाही. संजय राठोड व सुधीर मुनगंटीवार (विदर्भ); गुलाबराव पाटील, दादा भुसे, गिरीश महाजन आणि विजयकुमार गावित (उत्तर महाराष्ट्र); अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, अतुल सावे व तानाजी सावंत (मराठवाडा); चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील व सुरेश खाडे (पश्चिम महाराष्ट्र); उदय सामंत व दीपक केसरकर (कोकण) तर, रवींद्र चव्हाण (डोंबिवली) यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, मुंबईतून केवळ भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा हे मंत्रिमंडळात आहेत. तसेच, सावंतवाडीतून निवडून आलेले दीपक केसरकर हे मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेनेचा एकही मुंबईतील आमदार मंत्री नसल्याने मुंबईकरांच्या प्रश्नाला न्याय कधी मिळणार, हाही प्रश्न अनुत्तरीतच आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -