Homeदेश-विदेशWomens Day Special : तू विधात्याची एक सुंदर निर्मिती, सांग जगाला ठणकावूनी...

Womens Day Special : तू विधात्याची एक सुंदर निर्मिती, सांग जगाला ठणकावूनी…

Subscribe
  • सौ. मीनल सतीश सरकाळे

ज्याला स्त्री आई म्हणून कळली, तो जिजाऊचा शिवबा झाला
ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली, तो मुक्‍ताईचा ज्ञानदेव झाला
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली, तो राधेचा श्याम झाला
ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली, तो सीतेचा राम झाला…

स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कणखर कर्तृत्व..

दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. प्रत्येक महिलेसाठी हा सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. महिलांच्या योगदानाला आणि समाजातील त्यांच्या कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यासाठी आणि समाजात त्यांच्याबद्दल आदर व्यक्‍त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

इतिहासात डोकावलं तर मार्च १९०८ मध्ये न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगारांनी रुटगर्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. नंतर १९१० मध्ये कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारण्याचा ठराव झाला. महिलांना समाजात विशेष स्थान आणि सन्मान देण्यासाठी २८ फेब्रुवारी १९०९ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. परंतु १९७५ मध्ये अमेरिकेने हा दिवस ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दरवर्षी ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

यंदा जागतिक महिला दिन 2024 साठी Inspire Inclusion अर्थात महिलांच्या समावेशास प्रेरणा देणे ही संकल्पना स्वीकारण्यात आली आहे. म्हणजेच महिलांसाठी समाजाच्या सर्व पैलूंमध्ये विविधता आणि सक्षमीकरणावर भर देणे. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे तसेच रूढीवादी पद्धतींना आव्हान देणे, महिलांना आदर वाटेल असे वातावरण निर्माण करणे आणि महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे. यासाठी मी एवढेच म्हणेन की, ‘सामर्थ्याची ओढून घे नवी झालर, स्त्रीशक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर

समाजात पसरलेल्या विघातक दुष्कृत्यांचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो फक्‍त महिलांना. सर्व देशातील महिलांची स्थिती विचारात घेण्यासारखी आहे. एकविसाव्या शतकातही आजकाल महिला त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत अनेक शतकांपासून महिलांनी आपल्या हक्कासाठी अनेक प्रयत्न केले आहेत आणि आजही त्या आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढत आहेत. इतक्या वर्षात आपण किती वेळा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला हे माहित नाही, परंतु सत्य हे आहे की विशेषत: महिलांच्या सुरक्षेमध्ये आणि अधिकारांमध्ये काहीही बदल झालेला नाही. स्त्रियांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या अशा अनेक प्रथा भारतात पसरल्या आहेत. स्त्रियांना योग्य तो सन्मान मिळाला नसल्याचे प्रत्येक धर्मात दिसले आहे. ज्या प्रथा स्त्रियांच्या हक्कांवर गदा आणत आहेत, त्यामध्ये काळानुरूप काही बदल केले गेले आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर इतर विकसित देशातील स्त्रियांची स्थिती अशी दिसते.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते …रमन्ते तत्र देवता:

भारत असा देश आहे जिथे महिलांना देवी मानले जाते. नवरात्रीमध्ये मुलींची पूजा केली जाते. आपल्या परंपरा आणि सहिष्णुतेमुळे या देशाने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. परंतु खऱ्या अर्थाने आजही आपण महिलांना आवश्यक तो सन्मान देऊ शकलो नाही. न जाणो किती मुली अजूनही शिक्षणाच्या हक्कांपासून दूर आहेत. मुलींना जन्मापूर्वीच मारले जाते, स्त्री भूणहत्या केली जाते, किंवा त्यांना विकले जाते, त्यांना ओझे मानले जाते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अजूनही मुली रात्री उशिरापर्यंत घराबाहेर पडू शकत नाहीत. सातच्या आत घरात हा पायंडा फक्‍त मुलींसाठी पाडला आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेत शतकानुशतके महिलांना विशेष स्थान आहे. असे असले तरीही, एकीकडे महिलांच्या शोषणाला कुपोषणाला आणि दयनीय जीवनाला पुरुषप्रधान समाज जबाबदार धरला जात असताना, महिलांच्या मागासलेपणाला स्त्रिया ही तेवढ्याच जबाबदार आहेत हे कटू सत्य आहे…. पौराणिक काळापासून स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे याचे अनेक दाखले आपण पाहिले आहेत. घरातील कामाची विभागणी करतानाही अतिरिक्‍त जास्तीची कामे ही स्त्रियांना दिली जातात. पुरुष वर्गाला कामांसाठी डावलले जाते. कामाचा अतिभार हा स्त्रियांवर येऊन पडतो.

वर्षातून एकदा हा दिवस साजरा करून सन्मान मिळवण्यासाठी पुरेसा आहे का? महिलांचा सन्मान रोज केला असता तर कदाचित हा आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च रोजी साजरा करण्याची वेळच आली नसती. आंतरराष्ट्रीय महिला दिन केवळ एका दिवसासाठी साजरा केल्याने महिलांची स्थिती सुधारणार नाही. त्यांचा विकास होणार नाही. या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दरवर्षी आपण महिलांना किती आदर दिला आहे? आणि त्यांच्या उन्नतीसाठी किंवा विकासासाठी आपण कोणती पावले उचलली आहेत? यावर अवलोकन होणे आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने महिलांना समाजात योग्य स्थान दिले जात आहे हे समजू शकेल. तुमच्या माता भगिनींना तुमच्या घरातूनच आदर आणि आपुलकी द्या. महिलांना योग्य सन्मान आणि हक्क मिळावेत यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, आपण या विभागावर विसंबून राहू शकत नाही. त्यासाठी स्वतःपासून, स्वतःच्या घरापासून सुरुवात करण्याची नितांत आवश्यकता आहे कारण,

स्त्री म्हणजे ओथंबलेली माया .. वनराईची छाया
स्त्री म्हणजे न आटणारा झरा ..एक चमकता तारा
स्त्री म्हणजे दयेचा सागर ..नयनांचा जागर
स्त्री म्हणजे सतत तेवणारा नंदादीप… संस्कार रूपाने झळकणारा

खुल्या मनाने मूल्यमापन केले, तर महिलांना मिळालेल्या सन्मानानंतरही त्या दोन भागात विभागल्या गेल्याचे दिसून येते. एका बाजूला दलित, अशिक्षित आणि मागासलेल्या स्त्रिया आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पायावर उभे राहून प्रगतीच्या वाटेवर असलेल्या महिला आहेत. अनेक बाबतीत पुरुषांपेक्षा स्त्रिया प्रगतीची नवीन उंची गाठत आहेत. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास प्रत्येक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली असली तरी महिलांच्या स्वप्रगतीसाठी अजूनही खूप काही करायचे आहे. घराबाहेर, व्यवसाय असो, साहित्य विश्व, प्रशासकीय सेवा, परराष्ट्र सेवा पोलीस खाते असो की हवाई सेवा, किंवा क्रीडांगण, सर्वच क्षेत्रात महिलांनी यशाची पताका फडकवली आहे. स्त्रिया देखील अनेक राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुख आहेत. देशाचा कारभार चालविण्याचे कार्य करतात. अशाप्रकारे महिलांना मिळालेले हे यश निश्‍चितच समाधान देते. अशा परिस्थितीत सशक्त समाज आणि राष्ट्राच्या हितासाठी स्त्री-पुरुषांमध्ये वैर निर्माण होऊ नये, उलट सहकार्याचे संबंध वाढवले गेले पाहिजेत. सुशिक्षित आणि संपन्न महिलांनी मागासलेल्या महिलांसाठी जे काही करता येईल तेवढे करावे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी विशेष भर दिला पाहिजे. कारण महिलांच्या समस्या केवळ महिलाच चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्यामुळे सुशिक्षित आणि समृद्ध महिला या दिशेने विशेष योगदान नक्‍कीच देऊ शकतात. यासंदर्भात पुरुषांनाही त्यांच्या कर्तव्याचे भान ठेवावे लागेल. तसे पाहिले तर पुरुष स्वतःही अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. विशेषत: बेरोजगारीच्या समस्येने स्त्री-पुरुष एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून परस्पर सहकार्याच्या भावनेने समानतेने पुढे आले तरच समाज रचना मजबूत होईल आणि पर्यायाने राष्ट्रही मजबूत होईल. महिलांना समान अधिकार समान संधी आणि आदर हा स्वातंत्र्याचा पूर्ण अधिकार आहे, यात संशयाला जागा नाही. फक्‍त एक गोष्ट आपण स्वतः समजून घेतली पाहिजे ती म्हणजे आपली प्रतिभा, कार्यक्षमता, आवड आणि कल ओळखा. यांत्रिकपणे काम करण्याऐवजी स्वतःला आनंदी ठेवण्याचे काम करा तसेच स्वतःच्या क्षमतेवर, कर्तृत्वावर विश्‍वास ठेवा तरच तुम्हाला सभोवतालचे वातावरण आपोआप आनंदी दिसेल.

८ मार्च या अभिमानाच्या दिवशी आपण सर्वानी महिलांच्या उत्कर्षासाठी आणि त्यांच्या स्वाभिमानाचा रक्षण करण्यासाठी शपथ घेऊया की, प्रत्येक महिलांच्या सन्मानाचे रक्षण करू. त्यांचा सन्मान करू आणि त्यांना पुढे जाण्यास मदत करू. त्यांच्या प्रगतीस हातभार लावू. हा संकल्प प्रत्येक व्यक्‍तीने घेतला तर तो दिवस दूर नाही जेव्हा महिलांना खऱ्या अर्थाने त्यांचा हक्क आणि सन्मान मिळेल. आणि त्या देशाच्या प्रगतीत आपले महत्त्वाचे योगदान देऊ शकतील. कारण
विना सहकार.. नाही उद्‌धार.. !!
माझ्या वतीने आपणा सर्वाना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.. !!

दे पायातील शृंखला तोडूनी
मानेवरील जोखड दे भिरकावूनी| |
तू विधात्याची एक सुंदर निर्मिती
सांग जगाला ठणकावूनी||

लेखिका श्रमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि संस्था सदस्या आहेत.