LockDown : एमएमआर क्षेत्रात ९ मेट्रो प्रकल्पांच्या कामाला सुरूवात

प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्याने आता या ९ मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी कामाला सुरूवात करण्यात आली आहे. नॉन कन्टेंटमेंट झोनमध्ये ही कामाची सुरूवात करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मुंबई महानगर प्रदेशातील सर्व मेट्रो प्रकल्पांच्या कामाला अखेर सुरूवात झाली आहे. प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्याने आता या ९ मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी कामाला सुरूवात करण्यात आली आहे. नॉन कन्टेंटमेंट झोनमध्ये ही कामाची सुरूवात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या लॉकडाऊनच्या नियमात सूट देणारी मार्गदर्शके जाहीर झाल्यानंतर या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. पण लॉकडाऊनच्या काळात सुरक्षेच्या नियमांची पूर्तता करूनच या कामाला सुरूवात करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शकांनुसारच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कंत्राटदारांना सोमवारपासून काम करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. मुंबईतील फ्लायओव्हच्या ठिकाणी याआधीच कामाला सुरूवात झालेली आहे. तर मुंबई ट्रान्स हार्बर मार्गावरही कामाला सुरूवात झाली आहे. तर मेट्रोच्या ९ मार्गावरही कामाला सुरूवात झाली आहे. ठाणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरूवात होण्यासाठी काही अडथळे होते. पण अखेर या कामासाठी मंजुरी मिळाल्याने ठाण्यातील मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या मार्गदर्शकांचा अवलंब करूनच कामाला सुरूवात करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षा म्हणून एमएमआरडीएकडून मास्क, ग्लोज आणि हॅण्ड सॅनिटायजर्स कामगारांना देण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात बराचसा कालावधी वाया गेल्याने याचा परिणाम हा मेट्रो प्रकल्पाच्या डेडलाईनवर होणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर या संपुर्ण प्रकल्पांचा आढावा घेण्यात येणार आहे. या लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर प्रकल्प स्थितीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक प्रकल्पाच्या डेडलाईनमध्ये मुदतवाढ देण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर ए राजीव यांनी ११ हजार कामगारांना लॉकडाऊन कालावधीत सोयीसुविधा देणार असल्याचे याआधीच जाहीर केले आहे. त्यामध्ये गरजेच्या गोष्टींच्या सुविधा पुरवण्यापासून ते स्वच्छता आणि आरोग्याच्या सुविधा देणार असल्याचेही जाहीर केले आहे.

एमएमओपीएलच्या भरती प्रक्रियेला मुदतवाढ

मुंबई मेट्रोअंतर्गत २१५ पदांच्या भरती प्रक्रियेला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. या पदांसाठी आता १५ मे पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येतील. मुंबई मेट्रोअंतर्गत विविध पदांसाठीची ही भरती प्रक्रिया एमएमओसीएलमार्फत सुरू करण्यात आली होती. विभागीय अभियंता ११३ जागा, वरिष्ठ विभागीय अभियंता २५ जागा अशा विविध पदांसाठी २१५ जागांसाठी अर्ज करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ एक महिन्याने वाढवली असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले.