नागपूर – पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलेच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-3 च्या यशासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यासोबत त्यांनी बंगळुरुमध्ये रोड शो केला. हा रोड शो त्यांनी शास्त्रज्ञांना सोबत घेऊन केला असता तर देशाला अधिक आनंद झाला असता, अशी टीका पंतप्रधान मोदींवर काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
शास्त्रज्ञांनी अपार कष्ट करुन चांद्रयान-3 मोहीम यशस्वी केली आहे. शास्त्रज्ञांची अनेक वर्षांची मेहनत आहे, त्याला यश आले आहे. त्यांचे कौतूक पंतप्रधानांनी केलेच पाहिजे. पण बंगळुरुमध्ये त्यांनी रोड शो करण्याची काय गरज होती, असा सवाल करत वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांना सोबत घेऊन रोड शो केला असता तर देशाला अधिक आनंद आणि अभिमान वाटला असता. चांद्रयान-3 साठी शास्त्रज्ञांनी जे योगदान दिले आहे, त्याचा तो यथायोग्य सत्कार ठरला असता. पण यांचा रोड शो हा नेमका कशासाठी होता, हे देशातील जनतेला चांगलंच ठाऊक आहे, ते नक्कीच याबाबत विचार करतील. येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रोड शो केलेला दिसत आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. ज्या ठिकाणी चांद्रयान उतरले आहे, त्या ठिकाणाला शिवशक्ती असे पंतप्रधानांनी नाव ठेवले आहे, त्याबद्दल विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, नाव ठेवण्यात गैर काही नाही. नाव ठेवणे हेच यांचे काम आहे.
शरद पवार पुरोगामी विचारांसोबत
विधानसभा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार आज (शनिवार) नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शरद पवार हे देशपातळीवर ‘इंडिया’ आणि राज्य पातळीवर महाविकास आघाडीसोबत असल्याचे ठणकावून सांगितले आहे. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे महाराष्ट्राचे आणि देशातील ज्येष्ठ नेते आहेत. ते पुरोगामी विचारांना धरून पुढे निघाले आहेत, याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही.
माध्यमांना त्यांच्या बोलण्यात विसंगती वाटत असली तरी आम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास आहे, आणि त्यांच्या वक्तव्यांमध्ये कोणतीही विसंगती दिसत नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. शरद पवार सध्या जी भूमिका मांडत आहेत त्यामुळे निश्चितच ‘इंडिया’ला फायदा होणार आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल विचारलेल्या एका प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले, आरएसएसकडून महिलांचा सन्मान होत नाही. भारतीय जनता पक्षाचा ना लढाईचा इतिहास आहे, ना देश उभारणीचा इतिहास आहे. आता देशाची विभागणी ते करू इच्छित असतील, असा टोला त्यांनी संघ आणि भाजपला लगावला.
हेही वाचा : ISRO : पंतप्रधान मोदींनी घेतली इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट, चांद्रयान 3 लॅंड झालेल्या जागेला ‘शिवशक्ती’ नाव
नागपूरची जागा कोण लढवणार?
नागपूरची जागा काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी काळात काँग्रेसच्या वाट्याला आलेली होती. शिवसेना सोबत आल्यानतंर महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाला जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रात कुठं कोण लढणार? हे मी ठरवण्याचा अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना आहे. ते या बाबत ठरवतील.
राज्यात दुष्काळ घोषित करा – वडेट्टीवार
यंदा पाऊस कमी झाला आहे. पीकं धोक्यात आली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे, पीक विमा प्रश्न त्वरित सोडवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे.