घरदेश-विदेशमाफी मागायला मी सावरकर नाही

माफी मागायला मी सावरकर नाही

Subscribe

रेप इन इंडिया’ या राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याची भाजपची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सपशेल धुडकावून लावली आहे. ‘माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे’,‘सत्य बोललो म्हणून मला माफी मागायला सांगितली जातेय. मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळे मी घाबरणार नाही’, अशा शब्दात राहुल यांनी भाजपला सुनावले आहे.

देश वेगळ्या वळणावर आहे. देशाची अर्थव्यवस्था पुरती बिघडली आहे, वाढत्या महागाईने देशवासी पुरते खचले आहेत. वाढत्या बलात्काराच्या घटनांनी देशातला महिला वर्ग हबकला आहे. अशा परिस्थितीत लोकांचे लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आह

- Advertisement -

आधी पुलवामा, नंतर ३७० आणि आता नागरिकत्व कायद्याद्वारे लोकांना गुरफटून ठेवलं जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

सुधारीत नागरिकत्व कायद्यासह देशाला भेडसावणार्‍या घटनांच्या निषेधार्थ काँग्रेसने नवी दिल्लीत रामलीला मैदानावर ‘भारत बचाव’ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना राहुल गांधींनी अत्यंत आक्रमकपणे सरकारला जाब विचारला.

- Advertisement -

देशात वाढत्या बलात्काराच्या घटनांकडे लक्ष वेधत राहुल यांनी देशाचा प्रवास हा ‘मेक इन इंडिया’ च्या मार्गात होता. पण तो ‘रेप इन इंडिया’च्या दिशेने सुरू असल्याचा आरोप राहुल यांनी एका जाहीर सभेत केला केला होता. या वक्तव्यानंतर भाजपच्या खासदारांनी राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. संसदेत भाजप खासदारांनी राहुल गांधी यांच्या माफीची मागणी लावून धरली होती.

रामलीला मैदानावर आयोजित मेळाव्यात भाजपच्या या मागणीचा उल्लेख करत राहुल यांनी ‘माफी मागण्याचा संबंधच नाही’, असं म्हटलं. ‘मी काहीही चुकीचं बोललो नव्हतो. जे सत्य आहे, तेच बोललो होतो. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी आणि काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता घाबरत नाही. काँग्रेसवाले ‘बब्बर शेर’ आहेत. देशासाठी जीव द्यायलाही आम्ही तयार आहोत. कोणाच्या दबावाखाली येऊन माफी मागायला मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे,’ असा टोलाही त्यांनी हाणला.

मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपच्या मागणीला फटकारलं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे मोदींनी पूर्वोत्तर राज्यांना जाळलं आहे, असा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारने देशभर हिंसा निर्माण केली आहे. देशात धर्माच्या नावाखाली होत असलेल्या हिंसेला सरकार कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या शत्रूने केलं नाही ते मोदी सरकारने केलं, असं राहुल म्हणाले.

२० जणांचे दीड लाख कोटी माफ
‘गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानीला ५० कंत्राटे दिली. विमानतळं, बंदरांची एक लाख कोटींहून अधिक कामं दिली. काही दिवसांपूर्वीच अवघ्या १५ ते २० लोकांचं १ लाख ४० हजार कोटींचं कर्ज माफ केलं. ही चोरी आणि भ्रष्टाचार नाही तर काय आहे,’ असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर केला

…तर तोंड काळे करावे लागले असते
ही चांगली गोष्ट आहे की, राहुल गांधी यांचे नाव राहुल सावरकर नाही. त्यांचे नाव सावरकर असते, तर आम्हाला तोंड काळे करावे लागले असते, अशी प्रतिक्रिया स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या वादग्रस्त विधानावर दिली आहे. राहुल गांधी यांनी आजी इंदिरा गांधी यांचे त्यांच्या नावातून ‘नेहरु’ काढल्याबद्दल आभार मानले पाहिजेत. कारण त्यांचे आधीचे नाव इंदिरा गांधी-नेहरू होते. देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधीच सत्तेच्या मोहाने नेहरूंनी व्हॉईसरॉय मंडळाचे सदस्य बनण्यासाठी भारताचे सम्राट किंग जॉर्ज (सहावे) आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि वंशज यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. स्वा. सावरकरांनी असे घृणास्पद कृत्य करण्याचा स्वप्नातदेखील विचार केला नसता, असेही त्यांनी म्हटले आहे.

राहुलचे नाव जिन्ना ठेवावे-नरसिम्हा
‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावरुन माफी मागावी अशी मागणी करणार्‍या भाजपने राहुल यांच्यावर पलटवार केला आहे. माफी मागायला माझं नाव राहुल सावरकर नाही, गांधी आहे, या राहुल यांच्या उत्तरावर पलटवार करताना भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा यांनी राहुल गांधींना जिन्ना हे आडनाव लावण्याचा सल्ला दिला आहे. राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला. अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी,राहुल गांधी यांनी यावेळी सभेला संबोधित केलं. याच भाषणात राहुल गांधींनी आपण माफी मागायला सावरकर नसल्याचं सांगत भाजपला उत्तर दिलं. जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आणि राहुल गांधींचं नाव जिन्ना असायला हवं, असा सल्ला दिला. तुमच्यासाठी राहुल गांधीपेक्षा जिन्ना हे आडनाव अधिक योग्य आहे. तुमचं मुस्लीम राजकारण आणि मानसिकता तुम्हाला सावरकर नव्हे, तर जिन्नाचे योग्य वारसदार बनवते, असं ट्वीट जीव्हीएल यांनी केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -