अहमदनगर : राज्यात मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला मागील आठवड्यात शुक्रवारी (ता. 01 सप्टेंबर) जालन्यात वेगळे वळण लागले. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. त्याचवेळी 1 सप्टेंबरला पोलिसांकडून या आंदोलनाला चिरडण्यासाठी अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले असून गेल्या काही वर्षांपासून शांत असलेले मराठा आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत. परंतु आता आणखी एका समाजाकडून आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्यात आल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Yashwant Sena, indefinite hunger strike has started for Dhangar reservation in Chaundi)
हेही वाचा – मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; मुख्यमंत्री शिंदेंनी दिले ‘हे’ आदेश
मराठा समाजानंतर आता धनगर समाजाकडून सुद्धा आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे या आरक्षणाचा प्रश्न देखील पेटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळावे, यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आजपासून (ता. 06 सप्टेंबर) आंदोलनाला बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यशवंत सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. दोन आठवड्यानंतर सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा यशवंत सेनेकडून देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना यशवंत सेनेचे राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण मिळण्याबाबतच्या आम्हाला भाजपच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहे. या केंद्र सरकारने 370 वे कलम हटविले, राम मंदिराचा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न सोडविला, जे कधी सुटणार नाहीत असे वाटणारे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सोडविले आहेत. राज्यातील सरकारमध्ये भाजपला सत्तेत आणण्यासाठी धनगर बांधवाचा सिंहाचा वाटा आहे, असे त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
तसेच, देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळी बारामतीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये बोलताना फडणवीस म्हणाले होते की, धनगर आरक्षणाचा माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे. आमचे सरकार आले की पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न मार्गी लावू. मात्र, फडणवीस यांनी पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला, आता दुसऱ्यांदा सत्ता मिळाली आहे. तरीही आमची मागणी मान्य झालेली नाही. आरक्षणाशिवाय धनगर समाजाचे इतरही अनेक प्रश्न आहेत, तेही सोडविण्याची आमची मागणी आहे, अशी माहिती बाळासाहेब दोडतले यांच्याकडून देण्यात आली आहे.
धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळावे, यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. प्रत्येक सरकार व राजकीय पक्ष धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून जाहिर भूमिका घेतात. मात्र आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात काहीच कृती होत नाही. यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आता 18 ते 22 सप्टेंबरला संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण अंमलबजावणीचा वटहुकुम काढला जावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा, या मागणीसाठी आम्ही बी.के. कोकरे प्रणित यशवंत सेनेच्या वतीने हे आंदोलन सुरू केले आहे, असेही दोडतले यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर या आंदोलकांची उद्या (ता. 07 सप्टेंबर) कर्जत -जामखेचे आमदार रोहित पवार भेट घेणार आहेत.