अमरावती – अमरावतीमध्ये काही संघटना त्रिशूल वाटपाचे कार्यक्रम घेत आहे. त्रिशूळच्या नावाने तिथे गुप्ती वाटप होत आहे. यातून जिल्ह्यात काही अनुचित प्रकार घडू शकतो. या त्रिशूळ वाटपाच्या कार्यक्रमाची पोलिसांनी स्वतः दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशी मागणी काँग्रेस नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
अमरावतीमध्ये त्रिशूळ वाटपाच्या नावाखाली सर्रास गुप्ती वाटली जात असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. यावेळी त्यांनी गुप्तीचे फोटोही दाखवले. अशा कार्यक्रमांमुळे जिल्ह्यात आणि राज्याला हिंसक वळण लागेल, अशी भीतीही यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. पोलिसांनी त्रिशूळ वाटपचे कार्यक्रम कुठे-कुठे झाले आणि कोणी आयोजित केले याची माहिती घ्यावी. हे त्रिशूळ नसून गुप्ती आहे, असेही ठाकूर म्हणाल्या.
अकोला आणि अमरावतीमध्ये बांगलादेशी नागरिक रहात असल्याचा आरोप शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता त्यावरही यशोमती ठाकूर यांनी निशाणा साधला.
काँग्रेस नेत्या म्हणाल्या की एकीकडे बांगलादेशी घुसले म्हणता आणि गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात तुमचेच सरकार आहे. राज्यात तुमचे सरकार आहे. मग हे इकडे आलेच कसे? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला.
घरात साप घुसला तर मारायला काठी नाही, त्रिशूळ वाटपाचे संरक्षण
यशोमती ठाकूर यांच्या आरोपानंतर भाजपचे राज्यसभा सदस्य अनिल बोंडे त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. खासदार बोंडे म्हणाले की, यशोमती ताईंनी गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्यांना मुसलमानांच्या घरातील सत्तुर, कोयता दिसत नाही. धार्मिक कार्यक्रमात कोणी त्रिशूळचे वाटप करत असेल तर ते योग्यच आहे. हिंदूंच्या घरात साप घुसला तर त्याला मारायला लाकडी दांडा देखील त्याच्याकडे नाही. त्यामुळे स्व-संरक्षणासाठी जर घरात त्रिशूळ ठेवला जात असेल तर ते आवश्यकच आहे, असं खासदार बोंडे म्हणाले.
हेही वाचा : Walmik Karad : वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच येणार; धनंजय मुंडे जगमित्र कार्यालयात