येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा 6 दिवस आधीच मान्सून अंदमानात पोहोचल्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. तसंच, राज्यातही सर्वत्र पावसाचे लवकरच आगमन होणार आहे.
मान्सून 27 मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तसंच, सध्यस्थितीत असलेले वातावरण अनुकूल राहिल्यास मान्सून 6 जूनला मुंबईत तर 11 जूनला मराठवाड्यात पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच, 11 जूनपर्यंत मान्सून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, एकिकडे पावसाची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अचानक पाऊस
यवतमाळ जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली. या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाली आहे. या पावसामुळे शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच शेतात देखील पाणी साचल्याचे दिसून आले.
हेही वाचा – समृद्धी महामार्गालगतच्या सीएनजी गॅस पाईपलाईनचा ‘इतक्या’ जिल्ह्यांना होणार फायदा