आणखी एका आमदाराच्या गाडीला अपघात, कशेडी घाटात टँकरने दिली धडक

रत्नागिरी – राजकीय नेत्यांच्या गाड्यांना अपघात होण्याचे प्रमाण कमी होत नाहीये. नुकतेच धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात ताजा असतानाच आता आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. रात्री सव्वा दहाच्या सुमारास कशेडी घाटाजवळ चोळई येथे हा अपघात झाला. सुदैवाने योगेश कदम सुखरूप असून चालकाला चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदरसंघातील आमदार योगेश कदम खेडहून मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत त्यांचा अपघात झाला आहे. मागून आलेल्या टँकरने गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे योगेश कदम यांची गाडी पुढे असलेल्या पोलिसांच्या गाडीला धडकली. परिणामी चालकाला किरकोळ मार लागला. तर गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर टँकरचा चालक टँकर सोडून पळून गेला. तर योगेश कदम यांच्या गाडीच्या चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आमदार योगेश कदम यांनी ट्विट करत या अपघाताची माहिती दिली आहे. ‘आज दापोलीहून मुंबईला जात असताना माझ्या वाहनाचा अपघात झाला…देव कृपेने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या अपघातातून मी व माझे सहकारी सुखरूप बचावलो…माझ्या पुढील सर्व कार्यक्रमांना मी नियोजित वेळेत हजर राहणार आहे.’ असं योगेश कदम म्हणाले.