मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न, योगेश कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या(रविवार) खेडमध्ये सभा होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून जोरदारी तयारी केली जात आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि त्यांचे चिंरजीव आमदार योगेश कदम यांनी या सभेचा टीझर पोस्ट केला आहे. दरम्यान, खे़डमध्ये बॅनरबाजी करण्यात आली असून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, मला संपवण्यासाठी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना माझ्या मतदारसंघात पाठवण्यात आलं, असं म्हणत योगेश कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

योगेश कदम यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मला संपवण्यासाठी अनिल परब यांना माझ्या मतदारसंघात पाठवण्यात आलं. रत्नागिरीचे पालकमंत्री असताना सुद्धा अनिल परब तीन-चार दिवस फिरकले नाहीत. पण, नगरपंचायत निवडणुकीत मला संपण्यासाठी त्यांनी पाच ते सहा दिवस ठाण मांडलं होतं, असं योगेश कदम म्हणाले.

कदम कुटुंब यापुढे राजकारणात जिवंत राहू नये. यासाठी प्रयत्न करण्यात आले. कोकणातील खरा शिवसैनिक कुठेय?, हे तुम्हाला उद्या बघायला मिळेल. कार्यकर्त्यांमध्ये ज्या प्रकारे उत्साह असेल त्याचप्रकारे तुम्हाला बघायला मिळणार आहे. रामदास कदम हे भाजपच्या संपर्कात असल्याचे गैरसमज उद्धव ठाकरेंमध्ये पसरवण्यात आले. यामध्ये अनिल परब आणि सुभाष देसाई यांचा सहभाग असल्याचं योगेश कदम यांनी सांगितलं.

खेडमधील सभेला उद्या प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळेल. मागील काळात ज्याप्रकारे सभा घेण्यात आली. यावेळी रामदास कदम आणि योगेश कदम यांना आव्हान देण्यात आलं होतं. तसेच खेडमध्ये सभा घेण्यासाठी त्यांना पाच जिल्ह्यांमधून लोकं जमवावी लागली. त्यामुळे मतदारसंघात त्यांची ताकद नसल्याचे हे त्यांनीच सिद्ध करून दाखवलंय, असं म्हणत योगेश कदम यांनी ठाकरेंवर टीका केली.


हेही वाचा : विरोधकांच्या पोटात नुसती आग म्हणून.., बॅनरबाजीतून रामदास कदमांचा इशारा