मुंबई : राज्याची उपराजधानी नागपूरच्या विकासाच्या वल्गना शनिवारी चार तासांच्या मुसळधार पावसात वाहून गेल्या. कमी काळात प्रचंड पाऊस हे या हाहाकाराचे कारण सांगितले जात आहे. त्यात तथ्य असले तरी, नागपूरच्या विकासाच्या गप्पा शेवटी ‘गोलगप्पा’च ठरल्या या वस्तुस्थितीचे काय? नागपूरच्या विकासाचा ठेका आणि मक्ता ज्या स्वयंघोषित ठेकेदारांकडे वर्षानुवर्षे आहे, त्यांच्याकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे? ते नसल्यानेच मग आक्रोश करणाऱ्या पूरग्रस्तांना हाताने धरून बाजूला करण्याची वेळ आज तुमच्यावर आली. एखाद्या पूरग्रस्ताचे तोंड तुम्ही तात्पुरते बंद करू शकाल, पण या महापुराने तुमचे तोंड पुरते बंद केले आहे हे लक्षात घ्या, अशा शब्दांत ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा – मराठी पाट्या सक्तीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी संघटनांना दिला ‘हा’ सल्ला
मागील काही वर्षांत नागपूर शहराने कशी चहूबाजूंनी प्रगती केली आहे, विकासकामांनी कशी भरारी घेतली आहे याचे ढोल पिटले जात आहेत. सिमेंटचे रस्ते, फ्लायओव्हर्स, मेट्रो रेल्वे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला मेट्रो आणि फ्लायओव्हर यांचा संगम असलेला ‘डबल डेकर व्हायाडक्ट’ अशी अनेक उदाहरणे देत तेथील विकासाचा दाखला दिला जातो. मात्र हा डंका किती पोकळ आहे, हा विकास कसा तकलादू आहे, हे शनिवारी पहाटे पडलेल्या चार तासांच्या पावसाने उघड केले, अशी टीका शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आली आहे.
स्वयंघोषित विश्वस्तांनी लावलेले दिवे…
राज्याच्या दोन ‘उपप्रमुखां’पैकी सीनियर देवेंद्र फडणवीस स्वतःला नागपूरचे सुपुत्र समजतात. मात्र नागपूर महापुराच्या पाण्यात गटांगळ्या खात असताना, त्यात सापडलेले पूरग्रस्त मदतीसाठी टाहो फोडत असताना हे सुपुत्र मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर गणेश दर्शन घेत होते, बंद खोलीत चर्चा करीत होते. पावसाने, महापुराने व्हायचे ते नुकसान झाल्यावर ते त्यांच्या होम टाऊनमध्ये गेले. पूरग्रस्त भागाचा दौरा, पाहणी, पूरग्रस्तांच्या गाठीभेटी, नुकसानभरपाईचे आश्वासन हे नेहमीचे सोपस्कार पार पाडले. पूरग्रस्तांसाठी हे सगळे तर होणारच, परंतु सरकार म्हणून आणि नागपूरचे स्वयंघोषित विश्वस्त म्हणून तुम्ही आतापर्यंत जे दिवे लावलेत ते या महापुराने विझवले, त्याचे काय? असे या अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा – घर खरेदीदारांना मोदी सरकारकडून मिळणार गिफ्ट; गृहकर्जावर मोठी सबसिडी देण्याचा विचार
निसर्गाच्या बदलांचा विचारच नाही
वास्तविक नागपूरला अशा महापूर आणि हाहाकाराचा इतिहास नाही. तथापि मागील 30 वर्षांत किमान चारवेळेस अशी आपत्ती या शहरावर कोसळली आहे. शनिवारी त्याची पुनरावृत्ती भयंकर प्रमाणात झाली. मात्र शहर विकासाचा आराखडा आखताना निसर्गाच्या या धोकादायक बदलांचा कुठलाही विचार केला गेला नाही, हेच शनिवारी रात्री आलेल्या महापुराने दाखवून दिले. जेमतेम चार-साडेचार इंच पावसाने नागपूरच्या विकास धोरणाची अब्रूच वेशीवर टांगली, अशी बोचरी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.
काय प्रायश्चित्त घेणार?
एरवी मुसळधार पावसाने मुंबईत पाणी साचले की, शिवसेनेकडे बोट दाखविणारे तुम्हीच आहात ना? मग आता ज्या नाग नदीतून बोटी चालविण्याचे स्वप्न तुम्ही दाखविले त्याच नाग नदीत हजारो कुटुंबांची घरेदारे, संसार, गाड्या वाहून जाताना पाहण्याची वेळ नागपूरकरांवर का आली? त्यासाठी कोणाकडे बोट दाखवायचे? याच नाग नदीच्या महापुरात तुमच्या तथाकथित विकासाचा आज चिखल झाला आहे आणि त्या चिखलात सामान्य नागपूरकर आपले किडुकमिडुक शोधत वणवण फिरत आहेत. त्याचे काय प्रायश्चित्त तुम्ही घेणार आहात? अशा प्रश्नांची सरबत्ती ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – अनंत चतुर्दशीला श्री गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; भाविकांना केल्या ‘या’ सूचना
स्वयंघोषित ठेकेदारांचा मुखवटा गळून पडला
मुंबई तुंबली म्हणून शिवसेनेकडे बोट दाखविणाऱ्यांचे आता नागपूरचे ‘तुंबापूर’ झाले यावर काय म्हणणे आहे? मुंबईला जशी भौगोलिक मर्यादा आणि सागरी निर्बंध आहेत, दाटीवाटीची लोकवस्ती आहे तसे नागपूरबाबत नाही. तरीही तुमचे तेथील विकासाचे मॉडेल शनिवारच्या महापुरात वाहून गेले. केवळ चार तासांच्या पावसात नागपूर बुडाले. त्यात तुमच्या विकासाच्या थापा गटांगळ्या खाताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. या महापुराने नागपूरच्या स्वयंघोषित ठेकेदारांचा मुखवटाही गळून पडला. आता तरी ते आणि त्यांचा ‘परिवार’ काही ‘चिंतन’ करणार आहेत का? असा सवाल या अग्रलेखातून करण्यात आला आहे.