वाघांचे फोटो काढून वाघ होता येत नाही

मास्टर नव्हे, त्यांची तर लाफ्टर सभा, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे वाघ होते. बाळासाहेब भोळे होते. वाघ भोळाच असतो, धूर्त असतो तो लांडगा. बरे झाले उद्धवजी तुम्हीच स्वत:ला धूर्त म्हटले, मी नाही आणि तसेही आता या देशात एकच वाघ आहे आणि त्या वाघाचे नाव आहे आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी. वाघाचे फोटो काढले म्हणून कुणाला वाघ होता येत नाही. त्यासाठी निधड्या छातीने आव्हानांचा सामना करावा लागतो, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी रविवारी गोरेगावमधील नेस्को ग्राऊंडवर झालेल्या सभेत जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी फडणवीस यांनी हिंदुत्व तसेच बाबरी मशीद पाडण्याच्या मुद्यापासून ते मुंबई वेगळी करण्याच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिले.

आपल्या सभेला ते मास्टर सभा म्हणत होते, परंतु त्यांचे संपूर्ण भाषण ऐकल्यावर समजले की ती लाफ्टर सभा होती. शनिवारी संभाजी महाराज आणि भगवान नरसिंह यांची जयंती होती. आम्हाला वाटले काहीतरी तेजस्वी आणि ओजस्वी ऐकायला मिळेल, पण लाफ्टर शो शेवटपर्यंत संपलाच नाही. त्याच गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या. 100 सभांची बाप सभा असे आमचे मित्र म्हणत होते. खरेच आहे १०० कोणासोबत होते? कौरवांसोबत होते. पांडवांसाोबत पाच होते. कौरवांची सभा काल झाली, पांडवांची सभा आज होत आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी हल्लाबोल केला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कधी विचार केला असेल काय की त्यांच्या पुत्राच्या राज्यात हनुमान चालीसा म्हणणे देशद्रोह असेल. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीसा पठण करणे हा राजद्रोह आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणे हा राजशिष्टाचार असल्याचाही फडणवीस यांनी टोला लगावला.

औरंगजेब म्हणायचा, संभाजी धर्म बदला, मुस्लीम धर्म स्वीकारा, पण संभाजी राजा कधीच बधला नाही. शेवटी औरंगजेबाने त्यांचा खून केला, पण आता पूर्ण हिंदुस्थानावर भगवा झेंडा फडकणार आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात, त्यांनी तलवारी म्यान केल्या असतील, पण आम्ही तलवारी म्यान केलेल्या नाहीत. आम्ही मुकाबला निर्भीडपणे करणार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणायचे. त्याच मैद्याच्या पोत्याच्या पायावर नाक घासून उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री झालात. काल कोणीतरी ट्विट केले वाघ, फोटोग्राफी करून कोणाला वाघ होता येत नाही. उद्धवजी वाघाचे फोटो काढून कुणाला वाघ होता येत नाही. वाघ होण्यासाठी निधड्या छातीने आव्हानांचा सामना करावा लागतो. कुठला सामना केला तुम्ही सांगा, कुठल्या आंदोलनात तुम्ही होतात, कुठल्या संघर्षाला तुम्ही होतात, कुठल्या संघर्षाला नाही. दोन वर्षे कोरोनाचा संघर्ष चालला. मैदानात कोण होते, उद्धव ठाकरे होते, पण फेसबुक लाईव्ह करीत असल्याचा टोमणाही देवेंद्र फडणवीसांनी मारला.

मुंबई वेगळी करायची आहेच
मुद्दे नसले की मुंबई तोडण्याचा मुद्दा घ्यायचा हे शिवसेनेचे जुने राजकारण आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कुणामध्ये नाही. मुंबई वेगळी करायचीच आहे, मात्र ती केवळ यांच्या भ्रष्टाचारापासून दूर करायची आहे. गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार सुरू आहे. हा भ्रष्टाचार संपवत आम्हाला मुंबईला तुमच्या भ्रष्टाचारापासून दूर न्यायचे आहे. येणार्‍या निवडणुकांमध्ये भाजपची मुंबई मनपावर सत्ता येणार, असेही फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

माझे वजन 128 किलो
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी बाबरीवर पाय ठेवला असता तर बाबरी पडली असती. मला त्यांना सांगायचे आहे की आज माझे वजन १०२ किलो आहे. बाबरी पाडायला गेलो होतो त्यावेळी माझे वजन १२८ किलो होते. लाजायचे काय त्यात? मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसाची भाषा कळत नाही. त्यांना एफएसआयच्या भाषेत उत्तर द्यावे लागते, असे सांगत फडणवीसांनी प्रतीकात्मक उदाहरण देऊन ठाकरेंचा समाचार घेतला.