तुम्ही राजकारणापुरतं राजकारण करा; रामदास कदमांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा संताप

तुम्ही राजकारणापुरतं राजकारण करा. पण ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राची परंपरा नाही.

ajit pawar

राजकारण म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नेहमीच आरोप आणि प्रत्यारोप होत असतात. शिवसेनेतून (shivsena) बंडखोरी करून गेलेले शिंदे गटातील आमदार आणि शिवसेना यांच्यात आरोप – प्रत्यारोपांचं राजकारण सुरु आहे. दोन्ही बाजू एकमेकांवर विश्वासघात केल्याचा आरोप करत आहेत. पण काही वेळा टीका करताना पातळी घसरते . शिंदे गटाचे आमदार रामदास कदम(ramdas kadam) यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे(aditya thackeray) यांचा एकेरी उल्लेख करत करत त्यांच्यावर टीका केली. या सगळ्यावरच विरोधीपक्षनेते अजित पवार(ajit pawar) यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा – देशात चित्ते आल्याने लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? अजित पवारांचा केंद्राला सवाल

नेमकं काय म्हणाले रामदार कदम

रामदास कदम यांनी दापोलीमध्ये घेतलेल्या सभेत आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. “आंबादास तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करुन बघ. मग बायको आल्यावर संसार कसा ते कळेल. नुसती दाढी वाढवून काय फायदा? लग्न तर करुन बघ म्हणजे समजेल तुला संसार काय असतो ते. म्हणजे खोके काय असतील ते कळेल”, असं रामदास कदम म्हणाले. यावरून शिवसेनेकडूनसुद्धा आक्षेप घेतला गेला. यावरच विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा संताप व्यतक केला.

हे ही वाचा – राज ठाकरेंनी एकाचवेळी खरेदी केले चार केक; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

अजित पवार काय म्हणाले

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर जी टीका केली त्यावर अजित पवारांनी आपली प्रक्रिया दिली आहे. “तुम्ही राजकारणापुरतं राजकारण करा. पण ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्राला तशी शिकवणसुद्धा नाही. ज्यात राज्याचं नुकसान होत आहे, लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, या विषयांवर बोला. वैयक्तिक टीका-टिप्पणी कशाला करण्याची काय गरज? कुणी दाढी वाढवावी, कुणी दाढी काढावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण त्यावर बोलण्याचं काय कारण आहे?” असा प्रश्नसुद्धा अजित पवार यांनी उपस्थित केला.

‘रामदास कदम यांच्याशी माझी ओळख आहे’. ते सरकारमध्ये असताना आम्ही त्यांच्याकडे कामं घेऊन जायचो. मी सरकारमध्ये असताना ते माझ्याकडे कामं घेऊन यायचे. पण या बाबतीत इतक्या खालच्या पातळीवर बोलणं ही महाराष्ट्राची परंपरा नाही. कुणाची वैयक्तिक निंदा-नालस्ती करणे हे बरोबर नाही. ते लोकांना आवडत नाही. मागच्या काळात काही लोकांनी मोठ्या नेत्यांची चेष्टा केली होती. सोनिया गांधींचीही काहींनी चेष्टा केली होती. ते लोकांना आवडलं नाही”. असंही अजित पवार प्रतिक्रिया देत म्हणाले.

हे ही वाचा –  ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुन्हा नंबर 1 पक्ष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा