भाजपमध्ये राहा नाही तर कुठेही राहा, कारवाई होणारच..; फडणवीसांचा सूचक इशारा

आज (ता. ०५ मार्च) विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय यंत्रणांचा होत असलेला गैरवापर या विरोधात पत्र पाठवले आहे., यामध्ये देशातील ९ विरोधी पक्षातील नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच भ्रष्टाचारी राजकारण्यांना सूचक इशारा दिला आहे.

You stay in BJP or stay anywhere, action will be taken Fadnavis pointing

बहुतांश राज्यात भाजपच्या विरोधात असलेल्या राजकीय नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून करण्यात येणारी कारवाई आणि मुख्यमंत्र्यांच्या कामकाजात राज्यपालांचा वाढलेला हस्तक्षेप यामुळे देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पत्राबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी एक सूचक इशारा देखील दिला आहे.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांकडून होणाऱ्या कारवायांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप करण्यात येत नाहीये. त्यामुळे असे कुठले पत्र घेऊन किंवा पत्र लिहून चौकशीच्या फेऱ्यांमधून कोणाची सुटका होणार नाही. यावरील उपाय एकच आहे आणि तो म्हणजे हा भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमावलेला पैसा हे सर्व काही त्यांनी बंद केले पाहिजे.”

भारतीय जनता पक्षामध्ये कोणी आले म्हणून त्यांची चौकशी बंद झालेली नाही. असे असेल तर त्यांनी त्याचे उदाहरण दाखवावे. कोणाचीही चौकशी बंद होत नाही. भाजपमध्ये असो किंवा कुठेही असो, ज्यांनी चूक केली आहे, त्यांची चौकशी होणारच आहे, असा इशारा फडणवीस यांच्याकडून यावेळी देण्यात आला. तर एखाद्यावर जर का चुकीची कारवाई झाली तर न्यायालय आहे, ते निश्चितच न्याय देईल, असेही त्यांच्याकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षपातील ९ नेत्यांकडून पत्र लिहिण्यात आले आहे. उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना झालेल्या अटकेप्रकरणी हे पत्र लिहिण्यात आले असल्याची माहिती आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर सात विरोधी पक्षनेत्यांनी सही केलेल्या आहेत.

हेही वाचा – केंद्रीय यंत्रणांविरोधात विरोधी पक्षनेत्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीचे आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आम आदमी पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, के. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, फारुख अब्दुल्ला, अखिलेश यादव आणि शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांनी सह्या केल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेस वगळता इतर पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे पत्र लिहिले आहे.