घरमहाराष्ट्रतरुणांमध्ये जातीयवाद भडकवला जातोय - मकरंद अनासपुरे

तरुणांमध्ये जातीयवाद भडकवला जातोय – मकरंद अनासपुरे

Subscribe

'एकीकडे समाजातील लोकांच्या हितासाठी काम सुरु असताना दुसरीकडे तरूणांना जातीपातीच्या मुद्द्यावरुन भडकवलं जातंय, याचा खेद असल्याचं अनासपुरे म्हणाले.

‘सध्या महाराष्ट्रातील तरुणांची जाती-पातीवरून माथी भडकवली जात आहेत’ अशी खंत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली आहे. ‘यापूर्वी धर्मावरून भांडणे लावली जायची आणि आता जातीवरून धर्माधर्मात तेढ निर्माण केला जात आहे. महाराष्ट्रात सध्या जातीपातीचे भयंकर विष पेरले जात आहे आणि याचं खूप दु:ख आहे’, अशी नाराजीही मंकरद अनासपुरे यांनी व्यक्त केली. शहापूर तालुक्यातील वासिंद येथील सरस्वती विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमाला मकरंद अनासपुरे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी येथील विद्यार्थी, उपस्थितांशी संवाद साधला. अनासपुरे यावेळी बोलताना म्हणाले, की एकीकडे जातीपातीची भांडणे सुरू असताना दुसरीकडे राज्यातील दुर्गम भागात पाण्यासाठीही संघर्ष सुरू झाला आहे. शहरातील लोक ग्रामीण भागात नवनवीन धरणे बांधून पिण्यासाठी पाणी मागत आहेत. तर स्थानिकांना येथे पिण्यास पाणी नाही, शेतकर्‍यांच्या शेतीलाही पाणी उरले नाही, अशी दुर्देवी वेळ आली आहे.

अनासपुरे पुढे म्हणाले की, पूर्वी आपण धरणे भरलेली पाहायचो, विहिरी भरलेल्या पाहायचो, आता बाटलीबंद पाणी नव्या पिढीला बघावे लागत आहे. ते पाणी विकत घ्यावे लागते. महाराष्ट्रात दुष्काळाची ही दाहकता भयानक असून पुढील काळात पाण्याचा प्रश्न कठीण होईल, असे विदारक चित्र दिसते. जनावरांनादेखील चारा उरला नाही. जनावरांना चारा पुरवण्याचे काम ‘नाम’ फाऊंडेशन करत आहे. अलीकडेच ‘नाम’ने ५ ट्रक चारा विदर्भात पाठवला. शेळ्या वाटप, चारा वाटप, जलसंधारणाची कामे, शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत, अशी समाजोपयोगी काम असताना नाम फाऊंडेशन राज्यातील बावीसशे किलोमीटरपेक्षा अधिक दुर्गम भागात जाऊन पोहचली आहे.

- Advertisement -

‘एकीकडे समाजातील लोकांच्या हितासाठी, त्यांच्या विकासासाठी काम केले जात असताना दुसरीकडे मात्र याच राज्यातील तरूणांना जातीपातीच्या मुद्द्यावरुन भडकवलं जातंय, ही खरंच खूप खेदजनक गोष्ट आहे. एकंदरच या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे’, असं मत मकरंद अनासपुरे यांनी यावेळी व्यक्त केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -