तरुणीने फुलवली २० एकर बागायती शेती; जोडधंदा करत ठरली आदर्श शेतकरी

राजु नरवडे । संगमनेर

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाची उद्धारी’ हा विचार आज महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वकर्तृत्वाने सिद्ध केला आहे. जगभरात असे कोणतेच असे क्षेत्र नाही जिथे महिला कार्यरत नाही. प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग झेप घेतल्याची उदाहरणे आहेत. असेच उदाहरण संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहे. उच्चशिक्षित असलेली तरुणी आज तब्बल 20 एकरवरील शेती आधुनिकतेची जोड देऊन सांभाळत आहे. जोडीला दूध व्यवसायही करत आहे. यामुळेच कुटुंब आज प्रगतीच्या शिखरावर पोहोचले आहे.

अकलापूर गावांतर्गत असलेल्या शेळकेवाडी येथील लिंबाजी शेळके यांची मुलगी वंदना ही उच्चशिक्षित तरुणी एखाद्या तरुणालाही लाजवेल असे शेतीचे प्रयोग करीत आहे. घरची तब्बल 20 एकर बागायती शेती ती स्वतः सांभाळत आहे. यासाठी तिला कुटुंबियांची मोठी मदत होते. एकीकडे अनेक तरुणी चांगले शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे धावताना पाहायला मिळतात. परंतु, वंदनाने याला छेद देत बी.फार्मसीचे शिक्षण सुरू असतानाही आधुनिक पद्धतीने शेती सुरु केली आहे. तिची जिद्द व परिश्रम पाहून कुटुंबीय देखील तिच्या खांद्याला खांदा लावून मदत करत आहे.

परिसरात आज त्यांची शेती आदर्श ठरावी अशीच आहे. अलिकडे शेती हा व्यवसाय झाल्याने त्यात आधुनिकता वाढली आहे. यामध्ये ट्रॅक्टरचा वापर, तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन आणि नवीन प्रयोग वंदना करत आहे. नांगरणी, रोटा मारणे, फवारणी, पाणी भरणे, दूध काढणे आदी कामे ती करते. आपली मोठी बहीण अगदी जीव ओतून शेतीत रमते हे पाहून छोटी बहीण ऋतुजा देखील तिच्याच पावलावर पाऊल ठेवून मदत करते. सध्या त्यांच्या शेतात डाळिंब, कांदे, गहू, हरभरा, ऊस, चारापिके आहेत. याबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय उत्तमरीत्या करत आहे. अगदी दुधाची धार काढण्यापासून ते डेअरीवर घालण्यापर्यंतची सर्व कामे वंदना करत आहे. वडीलांच्या स्वप्नातील आदर्श शेती उभारण्यासाठी ती काम करत असल्याची भावना वंदनाने व्यक्त केली आहे. तिची ही प्रेरणा नक्कीच नोकरीच्या मागे धावणार्या तरुणाईला वेगळा विचार करण्यास भाग पाडणारी आहे.

माझ्या वडिलांमुळेच माझ्यात हे धाडस आले. ज्या पद्धतीने आई-वडील आपल्या मुलांचा हट्ट पुरवतात त्याच पद्धतीने माझे आई-वडील आम्हा दोन्ही बहिणींचा हट्ट पुरवतात. मी माझ्या मैत्रिणींना देखील सांगते की, तुम्ही ट्रॅक्टर, मोटारसायकल शिका. त्यातूनच धाडस निर्माण होते. मुलींनी कोणत्याच क्षेत्रात अडून न राहता पुढे गेले पाहिजे. यातूनच खर्या अर्थाने मुलींची ओळख जगाला होते. : वंदना शेळके (शेतकरी कन्या)

मला वंदना व ऋतृजा अशा दोन मुली आहेत. मुलगा नसल्याने शेती करण्यासाठी कोणीच नव्हते. मात्र आज माझ्या दोन्ही मुली मुलाप्रमाणेच शेती करत आहे. वंदना बी. फार्मसी करत असून, तिला ट्रॅक्टर चालविण्याचा छंद होता म्हणून ट्रॅक्टर घेऊन दिला. त्यामुळे ती ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची सर्व कामे करत आहे. दोन्ही मुलींनी आजपर्यंत मुलाची ऊणीव भासून दिली नाही. त्यामुळे माझ्या वंशाचा दिवा या दोन्ही मुलीच आहेत. : लिंबाजी शेळके (वंदनाचे वडील)