मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. जळगावमध्ये रविवारी झालेल्या सभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकापूर्वी गोध्रासारखी स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यावर पलटवार करताना भाजपाने, पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्या भोंदूसारखी तुमची अवस्था असल्याची टीका केली आहे.
जळगाव येथे रविवारी एका सभेला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. पुढील वर्षी जानेवारीत उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मोठा जनसमुदाय जमणार आहे. सरकारकडून बस आणि ट्रकमधून मोठ्या संख्येने लोकांना आमंत्रित केले जाऊ शकते. पण जेव्हा हे लोक परत निघतील, तेव्हा ‘गोध्रा’सारखी घटना घडू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – मराठा आरक्षण बैठकीच्या निमंत्रणावरून सरकारचा कोतेपणा दिसला; दानवेंची सरकारवर टीका
महाराष्ट्र भाजपाने ट्विटरवरून याला सडेतोड उत्तर दिले आहे, पोपट घेऊन भविष्य सांगणारा भोंदू असतो ना, तशी उद्धव ठाकरे यांची अवस्था झाली आहे. गेले कित्येक दिवस ते अनेक भविष्य वर्तवत आहात. अमुक ठिकाणी भाजपा दंगली घडवणार, तमुक ठिकाणं पेटणार… त्यात उद्धव ठाकरे यांचा पोपट (खासदार संजय राऊत) चिठ्ठ्या काढत नाही तर, तो वर्तमानपत्रात खोटे भविष्य लिहून मीडीयासमोर येऊन बरळतोही. यामागचा करता-करविता कोण हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारत देशाला माहीत आहे, अशी टीका भाजपाने केली आहे.
हेही वाचा – बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्याचा…; धनंजय मुंडेच्या टीकेला आव्हाडांचे उत्तर
सध्या उद्धव ठाकरे यांनी समस्त हिंदुंच्या राम मंदिरावरूनही तोंड उघडून टीका केली. त्यांना आता गोध्राची स्वप्न पडू लागली, हे जाहीर झाले. पण हे हिंदूंचे राष्ट्र आहे आणि राम मंदिर हे प्रत्येक हिंदूंचे स्वप्न आहे. उद्धव ठाकरे यांचे इरादे नेक नाहीत, हे स्पष्ट कळते; पण तमाम हिंदू त्यांच्या भविष्यवजा धमक्यांची दखल घेत आहे, असा सूचक इशाराही भाजपाने दिला आहे.