‘लालबागच्या राजा’ला यूट्युबचे ‘सिल्व्हर’ बटण; ठरले भारतामधील पहिलेच गणेश मंडळ

नवसाला पावणारा बाप्पा म्हणून संपूर्ण जगभरात ख्याती असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास यूट्यूब अमेरिकाकडून ‘सिल्व्हर’ बटण नुकतेच प्रदान करण्यात आले.

मुंबई : नवसाला पावणारा बाप्पा म्हणून संपूर्ण जगभरात ख्याती असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास यूट्यूब अमेरिकाकडून ‘सिल्व्हर’ बटण नुकतेच प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त करणारे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे देशातील पहिले वहिले मंडळ ठरले आहे. (YouTube Silver Button for Lalbagh Raja` First Ganesh Mandal in India)

कठीण काळात समाजमाध्यमांचा वापर

मुंबई किंवा महाराष्ट्रच नाही तर जगभरातील गणेश भक्तांना लाडक्या लालबागच्या राजाचे दर्शन घडवून देण्यासाठी या मंडळाने पुढाकार घेतला. कोरोना महामारीसारख्या कठीण काळात समाजमाध्यमांचा वापर प्रभावीपणे करणारे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पहिले मंडळ ठरले आहे.

डिजिटल माध्यमांचा योग्यप्रकारे वापर

जगभरात कोरोनाचा संसर्ग पसरल्याने उत्सव, सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या. मात्र अनेक उत्सव मंडळांनी डिजिटल माध्यमांचा योग्यप्रकारे वापर केला. मागील दोन वर्षे सर्वांचा लाडका गणेशोत्सवही ऑनलाइनच पार पडला. त्यावेळी अनेक भाविकांनी लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाइनच घेतले. समाजमाध्यमांचा प्रभावीपणे वापर केल्याप्रकरणी यूट्यूब अमेरिकातर्फे मंडळाला ‘सिल्व्हर बटण’ प्रदान करण्यात आले.

भाविकांच्या प्रेमामुळे शक्य

मंडळाच्या डिजिटल टीमला मिळालेले यश हे भाविकांच्या प्रेमामुळे मिळाले आहे. कोरोनाच्या काळात आम्ही अनेक उपक्रम राबवले, ते प्रत्येक उपक्रम समाजमाध्यमे व डिजिटल माध्यमांचा आधार घेत भाविकांपर्यंत पोहोचवले. लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईमधून नव्हे तर जगभरातून भाविक येत असतात. यापुढेही या माध्यमांचा वापर करून दर्शन तसेच इतर उपक्रम गणेशभक्तांपर्यंत पोहचवता येतील. त्यासाठी आम्ही कार्यरत राहू, असे लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले.


हेही वाचा – दिलासादायक! महाराष्ट्रातील मंकीपॅाक्सच्या 17 संशयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह