युवासेनेच्या ३५ महिला पदाधिकाऱ्यांचे एकाचवेळी राजीनामे, वरुण सरदेसाई उतरले मैदानात

varun sardesai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले. शिंदे गटात अनेक आमदार आणि खासदारांनी प्रवेश केला. आमदार, खासदार यांच्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सुद्धा शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला. मात्र, हा प्रवेश अद्यापही संपलेला नाहीये. कारण युवासेनेच्या पुण्यातील ३५ महिला पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. या सर्व महिला पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे ठाकरे गटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई हे मैदानात उतरले असून ठाकरेंसाठी ते पुन्हा संकटमोचक ठरले आहेत.

राजीनामा दिलेल्या युवासेनेच्या ३५ महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना भवनात वरुण सरदेसाई यांची भेट घेतली. या सर्व महिला आपला राजीनामा सुपूर्द करण्यासाठी शिवसेना भवनात आल्या होत्या. मात्र, वरुण सरदेसाई यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला. तुम्ही सांगितलेल्या अडचणींवर उपाय काढला जाईल. तुम्ही आपलं काम सुरु ठेवा, असं वरुण सरदेसाई म्हणाले.

पुण्यातील युवासेनेत अंतर्गत गटबाजी आणि कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे कारण देत ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु ठाकरे गटाच्या कोणत्या नेत्यांवर या महिला पदाधिकारी नाराज आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे वरुण सरदेसाई आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पक्षसंघटनेत काही बदल करणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील युवासेनेच्या तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यानंतर हे सर्व पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा होती. मात्र, युवासेना प्रदेश सहसचिव माधव पावडे यांनी मध्यस्थी करत या ३५ पदाधिकाऱ्यांची भेट वरुण सरदेसाई यांच्याशी घडवून आणली होती. त्यावेळी देखील सरदेसाई यांनी युवासेना पदाधिकाऱ्यांची समजूत काढली होती.


हेही वाचा : इतिहासाची मांडणी करताना समाजभान जपायला हवं, लेखिका अरुणा ढेरेंचे प्रतिपादन