विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी MMS, MCA प्रवेश परीक्षा सुट्टीच्या दिवशी घ्या, युवासेनेची मागणी

yuvasena demand take mca and mms exam in weekend days to avoid student conveyance
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी MMS, MCA प्रवेश परीक्षा सुट्टीच्या दिवशी घ्या, युवासेनेची मागणी

एआयसीटीई व यूजीसीने मान्यता दिल्याने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये प्रथमच मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) आणि मास्टर ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन (एमसीए ) हे अभ्यासक्रम सुरू होत आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा शुक्रवारी ३ डिसेंबरला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मात्र आयडॉलमधून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे नोकरी किंवा व्यवसाय करत असतात. त्यामुळे या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा शुक्रवारऐवजी रविवारी किंवा अन्य सुट्टीच्या दिवशी घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व युवासेनेकडून करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून एमएमएस अभ्यासक्रमाच्या ७२० तर एमसीए अभ्यासक्रमाच्या २००० जागांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाचे प्रवेश परीक्षांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान भरण्यात येत आहेत. एमसीए हा अभ्यासक्रम एमबीएच्या समकक्ष आहे. आयडॉलमध्ये एमसीए हा अभ्यासक्रम शिकवला जात नसल्याने मुंबई विद्यापीठातील अनेक विद्यार्थी अन्य विद्यापीठामध्ये प्रवेश घेत होते.

मात्र परीक्षा व अन्य उपक्रमावेळी त्यांना संबंधित विद्यापीठ व महाविद्यालयात जाणे बंधनकारक असे. त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील विद्यार्थ्यांना अन्य विद्यापीठामध्ये परीक्षेसाठी जाणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक पडत असे. आयडॉलमध्ये या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. अवघ्या पाच दिवसांमध्ये या दोन्ही अभ्यासक्रमांना मिळून जवळपास ९०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

मात्र दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा ही शुक्रवारी घेण्यात येत आहे. आयडॉलमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी हे नोकरी व्यवसाय करून शिक्षण घेतात. ही परीक्षा शुक्रवारी घेतल्यास अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे शक्य होणार नाही. त्यामुळे या दोन्ही अभ्यासक्रमांची परीक्षा शुक्रवारऐवजी रविवारी किंवा अन्य सुट्टीच्या दिवशी घेतल्यास प्रवेश परीक्षेला अधिकाधिक विद्यार्थ्यांना उपस्थित राहणे शक्य होईल. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा सुट्टीच्या दिवशी घेण्यात यावी, अशी मागणी युवासेनेचे अधिसभा सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


हेही वाचा :  मराठी साहित्य संमेलन : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीविनाच रंगणार सारस्वतांचा मेळा